अवघ्या १ वर्ष ५ महिने वयाच्या आयरिश चक्रवर्ती या चिमुकल्या जलतरणपटूने १०० मीटर अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या या पराक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये अधिकृत नोंद झाली आहे. तसेच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ आणि ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’साठीही त्याने विक्रमी प्रयत्न पूर्ण केला असून, अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे.
रत्नागिरी येथील शासकीय जलतरण तलावात हा विक्रमी प्रयत्न पार पडला. २५ बाय २१ मीटरच्या तलावात आयरिशने सलग चार फेऱ्या मारत १०० मीटरचे अंतर अवघ्या १६ मिनिटे ४५ सेकंदांत पूर्ण केले. इतक्या कमी वयात पाठीवर तरंगत हे अंतर पूर्ण केल्याने त्याच्या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे.
पाच महिन्यांच्या सरावात उल्लेखनीय यश
आयरिशने महेश मिलके स्विमिंग ग्रुपमध्ये अवघ्या पाच महिन्यांचा सराव केला. या अल्प कालावधीत मुख्य प्रशिक्षक महेश मिलके, प्रशिक्षिका गौरी मिलके, तनया मिलके आणि प्रशिक्षक करण मिलके यांनी त्याला मार्गदर्शन केले. त्यांच्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणामुळे आयरिशला ही उल्लेखनीय कामगिरी साध्य करता आली.
दुबईहून भारतात परतल्यानंतर पुण्यातून सरावाला सुरुवात
आयरिशचे पालक दुबईहून भारतात परतल्यानंतर त्यांनी पुण्यात त्याच्या जलतरण सरावाला सुरुवात केली. मात्र, लहान वयामुळे सरावात मर्यादा येत असल्याने त्यांनी महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवत रत्नागिरी गाठली. मिलके कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली आयरिशने जलतरणातील कौशल्य विकसित करत हा पराक्रम केला.
आयरिशच्या या कामगिरीमुळे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













