पाण्याचे महत्त्व केवळ पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर लक्षात येऊन चालणार नाही, तर पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवण्यासाठी वेळीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. याच विचारातून नरवण गावातील ग्रामस्थांनी अवघ्या अर्ध्या दिवसात श्रमदानातून दोन बंधारे बांधत जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि महिलांपासून प्रशासनातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येत पाणी अडविण्याच्या कामात सहभाग घेतला. गावातील पाणीटंचाईची संभाव्य समस्या लक्षात घेऊन उचललेले हे पाऊल परिसरातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.

जानेवारीपर्यंत वाहणारी नदी ऑक्टोबरमध्येच आटण्याच्या मार्गावर!
नरवण गावातील नदी साधारणपणे जानेवारी महिन्यापर्यंत वाहत असते. मात्र, यंदा ऑक्टोबर महिन्यातच नदीतील पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने ग्रामस्थांसमोर आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे आव्हान उभे राहिले आहे. उन्हाळा सुरू होण्यास अजून अवकाश असतानाच पाण्याची अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने जलसंधारणाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

अलीकडच्या काळात कोकणातील काही भागांमध्येही जमिनीतील ओलावा कमी होणे, खाजण भाग कोरडे पडणे आणि जलस्रोतांमधील पाण्याची पातळी घटणे अशा समस्या जाणवू लागल्या आहेत. मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांतील पाणीस्थितीचा विचार करता, पावसाचे पाणी अडवणे आणि जमिनीत जिरवणे ही काळाची गरज बनली आहे.

ग्रामसभेतील चर्चेतून श्रमदानाचा निर्णय
गावातील पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन ग्रामसेवकांनी ग्रामसभा बोलावली होती. यावेळी आगामी काळात निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा झाली. गावकरी एकत्र येऊन प्रत्यक्ष काम करण्यास तयार होतील का, हा प्रश्नही उपस्थित झाला.
याच वेळी ग्रामसेवकांनी पुढाकार घेण्याची तयारी असलेल्या एका ग्रामस्थाला, “तुम्ही काही कराल का?” असा प्रश्न विचारला. त्यानंतर त्यांनी सायंकाळी आपल्या नातुस्कर वाडीत जाऊन काही ग्रामस्थांशी चर्चा केली. बंधारे बांधण्याच्या कामासाठी लोकांना विचारणा केली असता, “करायचं का? करायलाच हवं!” असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रणवने मित्रांना फोन केले, विलास काकांनी काही माणसे तयार केली, तर अमोलनेही अनेकांना संपर्क साधला. बघता बघता १५ ते २० जणांनी श्रमदानासाठी तयारी दर्शवली. त्यानंतर ग्रामसेवकांशी संपर्क साधून दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे ठरवण्यात आले.
ग्रामसेवक, कृषी अधिकारी आणि ग्रामस्थांचा पुढाकार
बंधाऱ्यांसाठी योग्य जागा निश्चित करण्याच्या दृष्टीने ग्रामसेवक, कृषी अधिकारी आणि संबंधित ग्रामस्थांनी परिसराची पाहणी केली. पाण्याचा प्रवाह, उपलब्ध जागा आणि पाणी अडविण्याची शक्यता लक्षात घेऊन काही ठिकाणे निश्चित करण्यात आली.
यावेळी ग्रामसेवकांनी, “कोणी आले नाही तरी मी असेन. तुम्ही सोबत याल का?” अशी भूमिका मांडली. प्रत्यक्ष काम करण्याची तयारी असलेल्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा हा पुढाकार ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला.
गावात यापूर्वी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे जलसंधारणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमातून प्रेरणा घेत ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेण्याचे ठरवले. श्रमदानातून होणारे हे काम ज्येष्ठांचा आणि जलसंधारणासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासारखे असल्याची भावना सहभागी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सकाळी उशिरा सुरुवात; पण एकजुटीने कामाला वेग
दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजले, तरी सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे ग्रामस्थ जमा झाले नव्हते. त्यामुळे कामाला सुरुवात कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, ग्रामस्थ थोड्या वेळाने नक्की येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, केवळ फोटो काढण्यासाठी नव्हे, तर प्रत्यक्ष श्रमदान करण्यासाठीच सर्वांनी यावे, अशी स्पष्ट भूमिका काही ग्रामस्थांनी घेतली. त्यानंतर हळूहळू लोक जमा होऊ लागले आणि बंधारा बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली.
तरुण, प्रौढ, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष अशा सर्व वयोगटांतील ग्रामस्थांनी या कामात सहभाग घेतला. सुरुवातीला कामाची पद्धत ठरवण्यासाठी थोडा वेळ लागला. मात्र, एकदा कामाची साखळी तयार झाल्यानंतर प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारली. एका बाजूने दगड-मातीची रचना उभी राहत होती, तर दुसऱ्या बाजूने बंधाऱ्याला आकार दिला जात होता.
बघता बघता बंधाऱ्याचे एक-दोन थर पूर्ण झाले आणि पाणी साचण्यास सुरुवात झाली. श्रमदानात सहभागी झालेल्यांसाठी ग्रामस्थांनी चहा, फरसाण, ढोकळा, लिंबू सरबत आणि पाण्याची व्यवस्था केली होती. कोणताही मोठा गाजावाजा न करता, एकमेकांच्या सहकार्याने सलग काम सुरू राहिले.
पाण्यात उतरलेल्या गायीनेही जणू दिली कामाची पोचपावती!
बंधाऱ्यामुळे पाणी साचू लागल्यानंतर एक गाय त्या पाण्यात उतरली. तिचे पाण्यात डुंबणे पाहून श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जणू काही जनावरांसाठी पाण्याची सोय झाल्याची पोचपावतीच मिळाल्याची भावना उपस्थितांनी अनुभवली.
गावातील जनावरांनाही आगामी उन्हाळ्यात पाण्याचा आधार मिळावा, हा या प्रयत्नांमागील महत्त्वाचा उद्देश होता. पाण्याचे महत्त्व केवळ माणसांसाठीच नाही, तर जनावरे आणि संपूर्ण पर्यावरणासाठी किती आवश्यक आहे, याची जाणीव या उपक्रमातून झाली.
दुसऱ्या बंधाऱ्यासाठी महिलांची दमदार कामगिरी
पहिला बंधारा पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये उत्साह निर्माण झाला. मात्र, आणखी एक बंधारा बांधण्याची संधी असताना काम थांबवायचे नाही, असा निर्धार करण्यात आला. त्यानंतर ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा श्रमदान सुरू केले.
ऊन वाढले होते. काही ग्रामस्थ घरी परतले होते. तरीही कामाला सुरुवात होताच पुन्हा लोक जमा होऊ लागले. यावेळी महिला मंडळाने विशेष पुढाकार घेतला. पायांचे ऑपरेशन झालेले असतानाही काही महिलांनी अडचणींची पर्वा न करता कामाच्या ठिकाणी उतरून सहभाग घेतला. त्यांच्या उत्साहामुळे कामाला आणखी वेग मिळाला.
महिलांनी दाखवलेली जिद्द आणि श्रमदानातील सहभाग उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. काहींनी लिंबू सरबत आणले, तर काहींनी पाणी आणि बिस्किटांची व्यवस्था केली. श्रमाचा आनंद घेत, एकमेकांना साथ देत दुसरा बंधाराही पूर्ण करण्यात आला.
अशा प्रकारे अवघ्या अर्ध्या दिवसात नरवणकरांनी दोन बंधारे बांधून पाणी अडवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.
निसर्गाची शिकवण विसरल्याने पाण्याचे संकट?
या उपक्रमातून पाण्याच्या प्रश्नाबरोबरच निसर्ग आणि मानवी विकास यांच्यातील समतोलाचाही मुद्दा पुढे आला आहे. ऊसासारख्या अधिक पाणी लागणाऱ्या पिकांची वाढती गरज असो किंवा डोंगराळ भागांतील बदलते स्वरूप आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा विस्तार असो, विकासाच्या प्रत्येक निर्णयात स्थानिक जलस्रोतांवर होणाऱ्या परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे.
निसर्गाला माणसाच्या गरजांनुसार बदलण्यापेक्षा निसर्गाच्या मर्यादा समजून घेणे आणि उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. पावसाचे पाणी वाहून जाऊ देण्याऐवजी ते अडवणे, जमिनीत मुरवणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे, या बाबींना आता प्राधान्य द्यावे लागणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













