खेडच्या गुजरआळीत श्रीकृष्ण मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा 23 ते 26 ऑक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

banner 468x60

खेड शहरातील गुजरआळी येथील दशानेमा मुरली मनोहर मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण मंदिर जिर्णोद्धार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर ते सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक विधी, कलश मिरवणूक, छविना, ध्वजारोहण, छप्पन भोग, महापूजा, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

सन १९३३ मध्ये स्थापन झालेल्या दशानेमा मुरली मनोहर मंडळाच्या या सोहळ्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या निमित्ताने श्रीकृष्ण मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

शुक्रवार, २३ ऑक्टोबर : धार्मिक विधी आणि भव्य कलश मिरवणूक

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सकाळी ६.३० वाजता भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर पवित्र अभिषेक करण्यात येईल. सकाळी ७.३० वाजता श्रीगणेश पूजन, ८ वाजता उदकशांती, तर सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत होमहवन व विविध धार्मिक विधी पार पडतील. दुपारी १२.३० वाजता महाआरती होईल. सायंकाळी ४ वाजल्यापासून भव्य कलश मिरवणूक आणि छविना काढण्यात येणार आहे.

शनिवार, २४ ऑक्टोबर : कलशारोहण आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण

दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता कलशारोहण, तर ८.३० ते १० या वेळेत हिंदोळा कार्यक्रम होईल. सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत भगवान श्रीकृष्णाला छप्पन भोग अर्पण केले जातील. रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

रविवार, २५ ऑक्टोबर : सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसाद

रविवारी सकाळी ९ वाजता श्रीसत्यनारायणाची महापूजा होईल. दुपारी १२ ते २.३० या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ७.३० ते ९ या वेळेत रात्रीच्या भोजनाची व्यवस्था असून, रात्री ९ वाजल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि विशेष सन्मान सोहळा पार पडणार आहे.

सोमवार, २६ ऑक्टोबर : काकड आरतीने सोहळ्याची सांगता

सोमवारी पहाटे ५ ते ६.३० या वेळेत काकड आरतीला प्रारंभ होईल.

या धार्मिक सोहळ्यानिमित्त सर्व भाविक, नागरिक आणि श्रीकृष्णभक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आग्रहाचे निमंत्रण दशानेमा मुरली मनोहर मंडळ, खेड आणि दशानेमा मुरली मनोहर महिला मंडळ, खेड यांच्या वतीने देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *