नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या महिला विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘नवदुर्गा सन्मान सोहळ्या’त दापोली तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मान करण्यात आला. बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी जालगाव येथील श्री प्रीतिवर्धन मंगल कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात प्रणाली वालावलकर, पूजा चव्हाण, सारिका गुजराथी, नीलम जाधव, प्रणाली गुरव, माधुरी विचारे, समिधा मेहता, साक्षी बेंडल आणि डॉ. रश्मी जोशी या नऊ नवदुर्गांचा सामाजिक कार्यकर्त्या श्रेया योगेश कदम, दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, पंचायत समिती उपसभापती नम्रता तोडणकर आणि जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्रेया कदम यांनी महिला उद्योजिकांच्या एकत्रित सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “सर्वत्र उद्योजक मेळावे पाहायला मिळतात; मात्र नवरात्रोत्सवानिमित्त महिला उद्योजिकांचा मेळावा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान सोहळा अनुभवण्याची संधी मिळणे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.”
दापोली तालुक्यातील महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नामदार योगेशदादा कदम आणि आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, पंचायत समिती सदस्या नम्रता तोडणकर, दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा कविता मालू, सचिव अस्मिता परांजपे, खजिनदार आश्लेषा फाटक, व्यापारी संघटनेचे तालुका सचिव मिलिंद शेठ आणि खजिनदार मयुरेश फाटक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोमती अमृते यांनी केले, तर सचिव अस्मिता परांजपे यांनी प्रास्ताविक केले. महिला विभागाच्या अध्यक्षा कविता मालू यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. तालुका सचिव मिलिंद शेठ यांनी आभार मानले. रेणू सावंत यांच्या पसायदान सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
नवदुर्गा सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी महिला विभागाच्या समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला दापोली तालुक्यातील व्यापारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव आणि महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













