Breaking News

राजापूरच्या नाणार खाडीतील बेपत्ता मायरा भाटकरचा शोध सुरू; कोस्टगार्डचे कमांडो, हेलिकॉप्टरसह शोधमोहीम, रत्नागिरी पोलिस दलाची युद्धपातळीवर शोधमोहीम

banner 468x60

राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथील खाडीच्या पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर बेपत्ता असलेल्या मायरा जुनेद भाटकर या चिमुकलीचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून व्यापक शोधमोहीम सुरू आहे. या मोहिमेसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडोंची तसेच हेलिकॉप्टरची मदत घेतली जात असून, विविध पथकांच्या माध्यमातून खाडी परिसरात शोधकार्य सुरू आहे.

या दुर्घटनेत बुशरा जुनेद भाटकर, मोहम्मद जुनेद भाटकर आणि जुवेरिया जुनेद भाटकर यांचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. मात्र, त्यांच्यासोबत पाण्यात बुडालेली मायरा जुनेद भाटकर अद्याप मिळून आलेली नाही. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम

या शोधमोहिमेसाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांची मदत घेण्यात येत आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडोंसह हेलिकॉप्टरच्या सहाय्याने परिसरात शोध घेतला जात आहे. तसेच, पाण्यातील शोधकार्यासाठी पोलिस नौका विभागाचे जवान, कायकिंग बोट आणि मालवण येथील स्कुबा डायव्हिंग पथक तैनात करण्यात आले आहे.

पोलिस, होमगार्ड आणि बचाव पथके घटनास्थळी

घटनास्थळी लांजा उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम, नाटे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या उपस्थितीत शोधकार्य सुरू आहे. नाटे पोलिस ठाण्यातील १० पोलिस अंमलदार, सागरी सुरक्षेसाठी नियुक्त १० होमगार्ड, रत्नागिरी पोलिस नौका विभागाचे जवान तसेच मालवण येथील स्कुबा डायव्हिंग पथक या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

खाडीच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या मायराचा शोध घेण्यासाठी विविध यंत्रणांकडून प्रयत्न केले जात आहेत. या दुर्घटनेमुळे नाणार इंगळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बेपत्ता चिमुकलीचा शोध लागण्याची प्रतीक्षा ग्रामस्थ आणि कुटुंबीयांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *