भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कुणीतरी मदतीला येईल, याची वाट न पाहता संगमेश्वर तालुक्यातील आंबेवपोंक्षे गावातील भुवडवाडीच्या महिलांनी एकजुटीने पुढाकार घेतला आहे. महिलांनी श्रमदानातून ओढ्यावर बंधारा उभारून जलसंधारणाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. महिलांच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील काही भागांत जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत वाहणारे ओहोळ यंदा आतापासूनच आटू लागल्याने पाणीटंचाईची चिंता वाढू लागली आहे. ओढ्यांमधील पाण्याचा प्रवाह कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संभाव्य पाणीसमस्या टाळण्यासाठी भुवडवाडीतील महिला मंडळ आणि ग्रामस्थांनी एकत्र येत ओढ्यावर बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिलांनी प्रत्यक्ष श्रमदान करून पाणी अडविण्याचे काम पूर्ण केले.
आंबेवपोंक्षे ग्रामपंचायतीचे सरपंच शेखर उकार्डे आणि अन्य सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पावसाचे तसेच ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, हा या प्रयत्नामागील प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी टिकवून ठेवण्यास तसेच भूजल पुनर्भरणास मदत होण्याची अपेक्षा आहे.
महिलांच्या एकजुटीतून जलसंधारणाचा आदर्श!
पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य संकटाची चाहूल लागताच प्रतिबंधात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. भुवडवाडीतील महिलांनी हीच बाब ओळखून स्वतः श्रमदान करत जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली. त्यांच्या या पुढाकारातून महिला केवळ घराची जबाबदारी सांभाळत नाहीत, तर गावाच्या पाणीप्रश्नावरही प्रभावीपणे काम करू शकतात, हे अधोरेखित झाले आहे.
गावातील प्रत्येक ओढ्यावर वनराई बंधारे उभारणार
भुवडवाडीतील महिलांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करताना सरपंच शेखर उकार्डे यांनी आगामी काळात गावातील प्रत्येक ओढ्यावर वनराई बंधारे उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे राबविल्यास पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश कृतीतून देणाऱ्या भुवडवाडीतील महिलांचा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. पाण्याचे महत्त्व ओळखून प्रत्येक गावाने वेळीच जलसंधारणासाठी पुढाकार घेतल्यास भविष्यातील पाणीसमस्येची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













