पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा भविष्यातील पाणीटंचाईच्या काळात उपयोग व्हावा, तसेच भूजलपातळी वाढण्यास मदत व्हावी, या उद्देशाने चिपळूण तालुक्यातील नायशी येथे ‘मिशन बंधारे’ हा जलसंधारण उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात नायशी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदानातून नदीच्या प्रवाहावर कच्चा बंधारा उभारला.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. या पाण्याचा योग्य विनियोग करून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे करणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून नायशी येथे लोकसहभागातून बंधारा उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. उपलब्ध दगड, माती आणि इतर साहित्याचा वापर करून श्रमदानातून बंधाऱ्याचे काम करण्यात आले. या उपक्रमामुळे पाणी अडविण्यास मदत होऊन परिसरातील जलसाठा आणि भूजलपातळी संवर्धनाला हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजण्याची संधी मिळाली. केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देता येते, याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घालून दिला. श्रमदानातून श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक प्रयत्नांचे महत्त्वही अधोरेखित झाले.
यावेळी सरपंच कृतिका जाधव, किशोर घाग, गिरीश घाग, ग्रामसेवक योगेश सोनवणे, केंद्रप्रमुख तथा ग्रामपंचायत प्रशासक गोविंद काजरोळकर, प्रशांत पवार, गोविंद जाधव आणि कर्मचारी जीवक जाधव उपस्थित होते.
नायशी विद्यालयाचे मुख्याध्यापक सिद्धराया उत्तरे, शिक्षक सुरेश गवळी, संदीप घाग, राजेश माळी, दिनेश झगडे, रमेश भडवळकर, वैद्यकीय अधिकारी ऐश्वर्या उदापुरे व ममता गोसावी, स्वप्नाली घाग यांच्यासह अन्य मान्यवर, शिक्षक, महिला आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
लोकसहभागातून जलसंधारणाला बळ
जलसंधारण ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून, त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. नायशी येथे राबविण्यात आलेल्या ‘मिशन बंधारे’ उपक्रमातून लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करता येतात, हे स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी श्रमदानातून दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश भविष्यातील जलसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













