रत्नागिरी : बंद घर फोडून चोरी; रोख रकमेसह 49 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास

banner 468x60

रत्नागिरी शहरातील मजगाव रोड परिसरात बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी शहरातील नाखरेकर चाळ, मजगाव रोड येथील मेस्त्री व्हिला, घर क्रमांक ७६५, जे-१ येथे विजय जगन्नाथ नाखरेकर (वय ६३, व्यवसाय शेती) यांचे राहते घर आहे. दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादी यांचे घर बंद असताना अज्ञात व्यक्तीने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील विविध वस्तू आणि रोख रक्कम फिर्यादी यांच्या संमतीशिवाय चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घरगुती साहित्य आणि रोख रकमेची चोरी

चोरट्याने घरातील स्टीलची टाकी, हंडा, कळश्या, ताटे, वाट्या, तांब्या, जर्मनची भांडी, तवा, परात, कुकर, स्टीलची शेगडी, टेबल फॅन, प्लास्टिकच्या खुर्च्या व टेबल यांसह विविध वस्तू चोरून नेल्या. याशिवाय वापरत्या साड्या, शर्ट, पँट, टी-शर्ट, तांदूळ असलेला प्लास्टिकचा पिंप, रग, चादरी, चटई, ब्लँकेट, लाकडी पाट तसेच स्टीलचे आणि जर्मनचे डबे यांचाही चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये समावेश आहे.

या साहित्याबरोबरच घरातील सहा हजार रुपयांची रोख रक्कमही चोरीला गेली आहे. चोरीस गेलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ४९ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.

या प्रकरणी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ७.२२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चोरी करणारी व्यक्ती अज्ञात असून, या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *