मंडणगड : टाकेडे ग्रामस्थांचे श्रमदानातून जलसंधारण; दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी

banner 468x60

पावसाने दडी मारल्याने भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन मंडणगड तालुक्यातील टाकेडे येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून जलसंधारणाचा उपक्रम राबविला आहे. टाकेडे ग्रामविकास मंडळ ग्रामीण आणि उत्कर्ष महिला मंडळ, टाकेडे यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर ग्रामपंचायत हद्दीतील हौदाचा ओहळ येथे दोन वनराई बंधारे उभारण्यात आले असून, या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.

या उपक्रमासाठी आवश्यक साहित्य ग्रुप ग्रामपंचायत पालघरचे सचिव श्री. पालवे यांनी उपलब्ध करून दिले. मंडळाचे सदस्य रमेश चाळके यांनी स्वतःच्या नांगराच्या साहाय्याने जमीन नांगरून बंधाऱ्यांसाठी माती उपलब्ध करून दिली. ग्रामस्थ आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदानातून हा उपक्रम यशस्वी केला.

मंडळाचे अध्यक्ष अनंत शिंदे, उपाध्यक्ष एकनाथ चव्हाण, सचिव अनिल गणवे, माजी सभापती अमिता शिंदे, मंडळाचे सल्लागार सिताराम सुर्वे आणि ग्रामपंचायत सचिव पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले.

पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे या दृष्टीने वनराई बंधाऱ्यांचे महत्त्व मोठे आहे. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे यशस्वीपणे उभी राहू शकतात, याचे उदाहरण टाकेडे येथील या उपक्रमातून समोर आले आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आणि सहभागी सदस्यांचे मंडळाचे अध्यक्ष अनंत शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *