चिपळूण : मत्स्यबीज केंद्रासाठी करबवणेतील संपूर्ण जमीन तपासणार, वाशिष्ठीतील गाळ उपशासाठीही पाठपुरावाआमदार शेखर निकम यांच्या मागण्यांना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा सकारात्मक प्रतिसाद

banner 468x60

संगमेश्वर मतदारसंघातील मत्स्यव्यवसायाला चालना देणे, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि चिपळूण शहराचा पूरधोका कमी करण्याच्या दृष्टीने आमदार शेखर निकम यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या बैठकीत तीन महत्त्वपूर्ण विषयांचा पाठपुरावा केला. करबवणे येथे मत्स्यबीज केंद्राची उभारणी, पिंपळी खुर्द येथील जागेचे मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरण आणि वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा या विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

करबवणेतील संपूर्ण जमीन मत्स्यबीज केंद्रासाठी विचाराधीन

मौजे करबवणे येथील हिंदुस्तान युनिलिव्हरच्या नावे असलेली १३.८९८० हेक्टर जमीन महसूल थकबाकीमुळे शासनजमा झाली आहे. यापूर्वी या जमिनीतील केवळ दोन हेक्टर क्षेत्राचा विचार करण्यात आला होता. मात्र, संपूर्ण १३.८९८० हेक्टर क्षेत्रावर मत्स्यबीज केंद्र आणि रोजगारपूरक प्रकल्प उभारण्याची शक्यता आमदार शेखर निकम यांनी बैठकीत मांडली. यावर मंत्री नितेश राणे यांनी संपूर्ण जमिनीची पाहणी करण्याचे निर्देश दिले.

पिंपळी खुर्दमधील १० हेक्टर जागेच्या हस्तांतरणासाठी सकारात्मक निर्देश

मौजे पिंपळी खुर्द येथील गट क्रमांक २१ मधील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या ताब्यात असलेली १० हेक्टर जागा मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. या जागेवर वीज, पाणी आणि रस्त्याच्या सुविधा उपलब्ध असून, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव यांच्या पाणी परीक्षणातही ही जागा योग्य ठरल्याचे सांगण्यात आले. या जागेच्या हस्तांतरणाबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक निर्देश दिले.

वाशिष्ठी नदीतील गाळ उपशासाठी निधीचा मुद्दा उपस्थित

जुलै २०२१ मधील महापुरानंतर चिपळूण शहराच्या पूरप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर वाशिष्ठी नदीतील गोवळकोट ते बहिरवली या टप्पा क्रमांक तीनमध्ये ४२.७८ लाख घनमीटर गाळ उपसण्याचे नियोजन आहे. हे काम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत करण्यात यावे, तसेच ड्रेझर खरेदी आणि आवश्यक निधी उपलब्धतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी आमदार निकम यांनी केली.

मत्स्यव्यवसायाचा विकास, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी आणि चिपळूण शहराच्या पूरधोक्यावरील उपाययोजना या तिन्ही बाबींना महत्त्व देत आमदार शेखर निकम यांनी संबंधित प्रश्नांचा पाठपुरावा केला. या मागण्यांवर मंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने संबंधित प्रकल्पांच्या पुढील कार्यवाहीकडे आता लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *