लांजा : येथे मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकींची भीषण धडक; 54 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू

banner 468x60

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुवे पुरागाव हद्दीत दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मनोहर सिताराम गुरव (वय ५४, रा. वनगुळे, गुरववाडी, ता. लांजा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघातात दुसरा दुचाकीस्वारही जखमी झाला असून, त्याच्यावर रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात दुसऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर गुरव हे रविवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास आपल्या मेस्ट्रो दुचाकीने (क्रमांक एमएच ०८ एसी १८८९) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून वनगुळे गावाच्या दिशेने जात होते. ते कुवे पुरागाव परिसरात आले असता, त्यांच्या मागून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या डिओ दुचाकीने (क्रमांक एमएच ०८ एएम ९२२७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर रस्त्यावर फेकले गेले

दुसरी दुचाकी भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून मनोहर गुरव यांच्या वाहनाला धडक दिल्याचा आरोप आहे. या धडकेमुळे गुरव हे रस्त्यावर फेकले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही दुचाकींचेही मोठे नुकसान झाले.

या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दुसरा दुचाकीस्वारही जखमी

या अपघातप्रकरणी मनोहर गुरव यांचे जावई सुहास सखाराम भोवड (वय ३४, सध्या रा. वनगुळे, मूळ रा. डोंबिवली) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून डिओ दुचाकीचा चालक प्रथमेश रमेश करंबळे (वय २६, रा. आगरवाडी, लांजा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या अपघातात प्रथमेश करंबळे हादेखील जखमी झाला असून, त्याच्यावर रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *