चिपळूण तालुक्यातील कादवड धनगरवाडी येथे कौटुंबिक वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. बहिणीला माहेरी येण्यावरून जाब विचारल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कादवड धनगरवाडी येथील संतोष बाबा वरक (वय ४८) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांचा धाकटा भाऊ रमेश बाबा वरक (वय ३०) हा खेड येथून आपल्या दोन मुलांसह कुलदैवताच्या दर्शनासाठी कादवड येथील घरी आला होता. त्यानंतर सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्यांची बहीण विमल सचिन झोरे (रा. खोपी-शिरगाव, ता. खेड) हीदेखील माहेरी आली.
बहिणीला घरात आलेले पाहून रमेश वरक याने संताप व्यक्त करत तिला येथे का आलीस, तू येथे यायचे नाही, हे घर माझ्या वडिलांचे आहे, असे म्हणत हटकले. यावेळी मोठे भाऊ संतोष वरक यांनी मध्यस्थी केली. हे घर जसे तुझ्या वडिलांचे आहे, तसेच ते बहिणीच्याही वडिलांचे आहे आणि ती माहेरी येणारच, असे त्यांनी रमेशला सांगितले.
जाब विचारल्याच्या रागातून डोक्यात प्रहार
मोठ्या भावाने जाब विचारल्याचा राग आल्याने रमेश वरक याने घरातील लाकडी दांडका उचलून संतोष यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात संतोष यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
त्यानंतर आरोपीने संतोष यांना त्यांच्या शेतीत पाय ठेवल्यास बघून घेण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शिरगाव पोलिसांकडून पुढील तपास
या घटनेनंतर जखमी संतोष वरक यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रमेश बाबा वरक याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीतील माहितीनुसार, भादंवि कलम ३२४ आणि ५०६ यांचाही संदर्भ देण्यात आला आहे.
कौटुंबिक वादातून सख्ख्या भावांमध्ये झालेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













