खेड : भोस्ते घाटात ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

banner 468x60

खेड मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात ब्रेक फेल झाल्याने जांभा दगड वाहून नेणाऱ्या बारा चाकी ट्रकचा भीषण अपघात झाला. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०८ एपी २७३६ क्रमांकाचा भारत बेंच कंपनीचा बारा चाकी ट्रक जांभा दगड घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. भोस्ते घाटातील ‘ब्लाइंड स्पॉट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवघड वळणाच्या उतारावर अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

नियंत्रणाबाहेर गेलेला ट्रक प्रथम महामार्गालगतच्या संरक्षक भिंतीवर आदळला. त्यानंतर ट्रक महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर जाऊन धडकला. या धडकेमुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, अपघाताच्या वेळी कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.

भोस्ते घाटातील अवघड वळणे आणि उतार यांमुळे अवजड वाहनांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. या अपघाताच्या निमित्ताने अवजड वाहनांची तांत्रिक तपासणी, विशेषतः ब्रेक यंत्रणेची देखभाल, किती महत्त्वाची आहे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. घाटातून प्रवास करताना वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *