गुहागर : तालुक्यातील वृद्ध बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल

banner 468x60

गुहागर तालुक्यातील आबलोली येथे राहणारे गणपत बाबाजी निवाते (वय ७२) हे ७ ऑक्टोबर रोजी सकाळी घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाले आहेत. नातेवाईकांनी परिसरात तसेच इतर ठिकाणी शोध घेऊनही ते न सापडल्याने, त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुहागर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत बाबाजी निवाते हे मूळचे खोडदे, निवातेवाडी, ता. गुहागर येथील रहिवासी असून सध्या आबलोली येथे वास्तव्यास होते. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ते घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात तसेच परिचितांकडे त्यांचा शोध घेतला; मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत.


अखेर त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांचे भाऊ तकाराम बाबाजी निवाते (वय ६०, निवृत्त शिक्षक, रा. आबलोली, ता. गुहागर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.२३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १४०(३) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी अज्ञात आहे. बेपत्ता गणपत निवाते यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *