वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त दापोली वन विभाग आणि वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर टीम, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने शिरशिंगे गावठाण मैदान येथे देशी वृक्षलागवड उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून वन्यजीवांचे संरक्षण आणि निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी विजय सूर्यवंशी, परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, शिरशिंगे गावचे सरपंच सुरेश मांडवकर, दापोलीचे वनपाल रामदास खोत आणि वनरक्षक विश्वंभर झाडे यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागातील वनरक्षक उपस्थित होते.
तसेच वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर संस्थेचे अध्यक्ष मिलिंद गोरीवले, उपाध्यक्ष मनीत बाईत, सचिव तुषार महाडिक, सदस्य प्रतीक बाईत, वैभव बाईत, गुंजन गोरीवले आणि साईनाथ कात्रे यांच्यासह शिरशिंगे व नवशी गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. देशी वृक्ष स्थानिक जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्यामुळे पक्षी, फुलपाखरे, कीटक आणि विविध वन्यजीवांना अन्न, निवारा तसेच सुरक्षित अधिवास उपलब्ध होण्यास मदत होते. वन्यजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, अधिकाधिक देशी वृक्षांची लागवड करावी आणि लावलेल्या झाडांचे नियमित संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे जतन करून ती वाढविणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
दापोली वन विभाग आणि वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर टीम यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाविषयी जनजागृती करण्यास हातभार लागला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













