प्रतिनिधी : सागर गोवळे
पावसाचे पाणी अडवून त्याचा योग्य वापर करण्यासह भूजल पातळीत वाढ व्हावी आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करता यावी, या उद्देशाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या दापोली येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषिस्नेही’ गटाच्या वतीने वडवाडी आणि वणौशी येथे पावसाचे पाणी संवर्धन या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पावसाचे पाणी साठवण्याच्या आधुनिक तंत्रांची माहिती
उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई कमी करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि संवर्धन आवश्यक आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी विविध जलसंधारण पद्धतींची माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे दिली. यामध्ये छतावरील पाणी संकलन, अस्तरीकरण केलेले शेततळे, समपातळी बांध, साठवण विहीर, सामुदायिक पाण्याची टाकी आणि भूजल पुनर्भरणासाठी रिचार्ज खड्डा अशा उपाययोजनांचा समावेश होता.

विशेषतः रिचार्ज खड्ड्याची शास्त्रीय रचना, त्यामध्ये वापरण्यात येणारे विविध थर, पीव्हीसी पाइपची रचना आणि छतावरून येणारे सुरुवातीचे दूषित पाणी बाजूला वळवण्यासाठी वापरले जाणारे ‘फर्स्ट फ्लश डायव्हर्टर’ याविषयी विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती दिली. या प्रात्यक्षिकांमुळे शेतकऱ्यांना पावसाचे पाणी संकलित करणे आणि जमिनीत मुरवण्याच्या पद्धती समजून घेण्यास मदत झाली.

जलसंधारणासोबत देखभालही महत्त्वाची
पावसाचे पाणी संवर्धनासाठी केवळ यंत्रणा उभारणे पुरेसे नसून तिची नियमित देखभाल करणेही आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. गटार, पाइप, गाळणी आणि पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता राखणे, तलावांमधील गाळ काढणे तसेच लहान बंधारे उभारून पाणी जमिनीत मुरवणे यांसारख्या उपाययोजनांवर भर देण्यात आला.
या पद्धतींचा योग्य अवलंब केल्यास पाण्याची नासाडी कमी होऊन सिंचनासाठी तसेच उन्हाळ्यातील गरजांसाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. पावसाचे पाणी संवर्धन ही किफायतशीर, पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी उपयुक्त पद्धत असल्याचा संदेशही या वेळी देण्यात आला.
कृषी महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्रप्रमुख डॉ. विजय देसाई आणि विषयतज्ज्ञ डॉ. सचिन पाठक यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांनी नियोजनासाठी सहकार्य केले.
‘कृषिस्नेही’ गटातील विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे वडवाडी आणि वणौशी परिसरातील शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापनाच्या विविध तंत्रांची माहिती मिळाली. जलसंधारणाबाबत जनजागृती करत शाश्वत शेती आणि पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













