चिपळूण : कामावर जाताना 40 वर्षीय महिला बेपत्ता, अपहरणाचा संशय

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथून कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेली ४० वर्षीय महिला गूढरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. तिला गुप्तपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रूपाली मारुती जाधव (वय ४०, रा. दत्तछाया निवास, रूम नं. ७, कलावती आई मंदिरासमोर, खेर्डी) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अनंत विठ्ठल रहाटे (वय ४५, रा. दत्तछाया निवास, खेर्डी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादी अनंत रहाटे आणि रूपाली जाधव हे गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून खेर्डी येथील फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास रूपाली जाधव या नेहमीप्रमाणे ‘शिवराज ढाबा’ येथे कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. मात्र, कामाची वेळ संपल्यानंतरही त्या संध्याकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत.

रूपाली यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. तसेच, नातेवाईक व परिचितांकडे तसेच इतरत्र शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने त्यांना गुप्तपणे व गैरमार्गाने डांबून ठेवण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अनंत रहाटे यांच्या फिर्यादीवरून चिपळूण पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता महिलेचा तसेच संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांकडून तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *