मंडणगड : गुरांच्या गोठ्याला भीषण आग, दोन दुभत्या गाईंचा होरपळून मृत्यू, दहागाव निमदेवाडीतील दुर्घटना

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील मौजे दहागाव निमदेवाडी येथे मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून, दोन दुभत्या गाईंचा होरपळून मृत्यू झाला. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार गोठा आणि पशुधनाचे मिळून अंदाजे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

महेंद्र रामचंद्र चव्हाण व नीलेश रामचंद्र देवरुखकर यांच्या गुरांच्या गोठ्याला ही आग लागली. घटनेच्या वेळी गोठ्यात दोन गाई आणि दोन वासरे बांधलेली होती. गोठ्यातून धुराचे लोट व आग दिसून येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन वासरे आणि एका गाईला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दोन दुभत्या गाईंना आगीतून बाहेर काढता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

आगीची तीव्रता एवढी होती की गोठ्यासोबतच लगत असलेली लाकडाची खोपीदेखील जळून नुकसान झाले. ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच मंडणगडचे महसूल मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, ग्राम महसूल अधिकारी उद्धव घाटूश, सरपंच मंगेश दळवी, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच बहुसंख्य ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाकडून घटनास्थळी नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.

पंचनाम्यानुसार गोठ्याचे अंदाजे ८० हजार रुपये, तर दोन दुभत्या गाईंच्या मृत्यूमुळे अंदाजे ८० हजार रुपये, असे एकूण १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे संबंधित पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *