जिल्हा परिषद शाळेत तब्बल ३२ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या दिव्यांग शिक्षकाला आपल्या हक्काच्या प्रवास भत्ता बिलासाठी गेल्या पावणे दोन वर्षांपासून पंचायत समितीच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे जानेवारी २०२५ मध्ये सादर केलेले हे बिल अद्याप मंजूर झाले नसल्याचा आरोप संबंधित शिक्षकाने केला आहे.
ज्येष्ठ शिक्षक एजाज महमूद इब्जी हे नोव्हेंबर २०२४ मध्ये जिल्हा परिषद शाळेतील ३२ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर नियमानुसार स्वगृही परतण्यासाठी मिळणाऱ्या प्रवास भत्त्याचे बिल त्यांनी जानेवारी २०२५ मध्ये पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे सादर केले. मात्र, त्यानंतर बराच कालावधी उलटूनही या बिलावर कार्यवाही झालेली नसल्याचे इब्जी यांचे म्हणणे आहे.
पाच वेळा लेखी पाठपुरावा, तरीही प्रश्न कायम
हक्काचे बिल मंजूर व्हावे यासाठी इब्जी यांनी गेल्या २१ महिन्यांत तब्बल पाच वेळा लेखी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर जुलै २०२५ मध्ये झालेल्या सेवानिवृत्त समस्या निवारण सभेतही त्यांनी हा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडला होता. त्यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा विषय मांडण्यात आल्याचे इब्जी यांनी सांगितले.
मात्र, या पाठपुराव्यानंतरही बिल मंजूर झाले नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित फाईल नेमक्या कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे आणि त्यावर अद्याप निर्णय का झाला नाही, याबाबत स्पष्टता मिळणे आवश्यक असल्याचेही बोलले जात आहे.
अपघातात पाय गमावला, तरीही कार्यालयाच्या फेऱ्या
एजाज इब्जी हे अपघातात पाय गमावलेले दिव्यांग शिक्षक आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामासाठी पंचायत समितीत वारंवार ये-जा करणे त्यांच्यासाठी अधिक त्रासदायक ठरत आहे. कुबड्यांच्या आधाराने पंचायत समितीच्या पायऱ्या चढून हक्काच्या बिलासाठी पाठपुरावा करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
३२ वर्षे शिक्षण विभागात सेवा केल्यानंतर सेवानिवृत्तीच्या काळात आपल्या हक्काच्या रकमेसाठी वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागणे हा मानसिक आणि शारीरिक त्रासदायक अनुभव असल्याचे इब्जी यांनी सांगितले.
“३२ वर्षे मी या विभागाची सेवा केली आणि आज पावणे दोन वर्षे मी माझ्याच हक्काच्या बिलासाठी खेटे मारतोय. हे दिव्यांगांचा अपमान नाही का?” असा सवाल एजाज इब्जी यांनी केला.
थेट दिव्यांग आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा
वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने आता राज्य दिव्यांग आयुक्त तसेच दिव्यांग कल्याण विभाग, मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा इब्जी यांनी दिला आहे. संबंधित बिलाची तातडीने चौकशी करून ते नियमानुसार मंजूर करावे आणि प्रलंबित प्रकरणावर कार्यवाही करावी, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, एका दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षकाचे बिल इतका प्रदीर्घ काळ प्रलंबित राहण्यामागचे कारण काय, फाईल सध्या कोणत्या स्तरावर आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबत काय कार्यवाही करण्यात आली, याची माहिती समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता पंचायत समितीचा शिक्षण विभाग या प्रकरणात काय भूमिका घेतो आणि इब्जी यांना त्यांच्या हक्काची रक्कम कधी मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













