मंडणगड तालुक्यातील लाटवण येथे विजेच्या मुख्य वाहिनीची तुटलेली तार पायाला चिकटल्याने विजेचा जोरदार धक्का बसून दहा वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३ ऑक्टोबर रोजी घडली. मयुर अनिल पवार (वय १०, रा. लाटवण आदिवासीवाडी, ता. मंडणगड) असे मृत बालकाचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे लाटवण परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयुर पवार हा ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे सातच्या सुमारास घरातून कोयती घेऊन बाहेर पडला होता. मात्र, दुपारचे दोन वाजले तरी तो घरी परतला नाही. मयुर घरी न आल्याने त्याची चुलती लता घोगरेकर यांनी त्याचे मामा संदीप धाकट्या घोगरेकर यांना याबाबत माहिती दिली.
मयुर बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांसह स्थानिक ग्रामस्थांनी त्याचा परिसरात शोध सुरू केला. नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून विविध ठिकाणी शोध घेतला जात असतानाच रात्री सुमारे आठच्या वाजण्याच्या सुमारास लाटवण हायस्कूलजवळील बांबूच्या बेटाच्या परिसरात मयुरचा शोध लागला.
प्रशांत गंगाराम पवार यांना सिमेंटच्या इलेक्ट्रिक पोलजवळ मयुर उताण्या अवस्थेत पडलेला दिसून आला. त्यानंतर स्थानिकांनी जवळ जाऊन पाहिले असता मयुरच्या दोन्ही पायांना विजेच्या मुख्य वाहिनीची तुटलेली तार चिकटलेली असल्याचे निदर्शनास आले.
मुख्य विद्युत प्रवाहाची तार पायाला चिकटल्याने मयुरला अतिउच्च दाबाचा जोरदार विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत त्याच्या दोन्ही पायांना गंभीर स्वरूपाच्या भाजलेल्या जखमा झाल्या होत्या. विजेचा तीव्र प्रवाह शरीरातून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या दहा वर्षांच्या बालकाचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे लाटवण आदिवासीवाडी तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती संदीप घोगरेकर यांनी मंडणगड पोलिसांना दिली. त्यांच्या माहितीवरून मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













