मिरकरवाडा जेटी येथे मच्छी खरेदी करण्याच्या कारणावरून एका मच्छीमार सप्लायरला लोखंडी फायटरने बेदम मारहाण करून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या हल्ल्यात रज्जाक हमजा साब (वय ४३, व्यवसाय मच्छीमार सप्लायर, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, शिवाजीनगर, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात शफिक महमद शरीफ दर्वे (वय ४५) आणि अब्दुल्ला शफिक दर्वे (वय २२, दोघेही रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता रज्जाक साब हे मिरकरवाडा जेटी येथे जमीर अब्दुल रहफ होडेकर आणि महंम्मद मुसेफ मुराद भाटकर यांच्याकडून मच्छी खरेदी करत होते. त्यावेळी आरोपी शफिक दर्वे आणि अब्दल्ला दर्वे तेथे आले.
यावेळी आरोपींनी रज्जाक यांना, ‘तुला सांगितले होते ना, तू मिरकरवाडा येथे मच्छी खरेदी करण्याची डेअरिंग कशी केलीस? तुझी आता मर्डर करतो,’ असे म्हणत धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर आरोपी क्रमांक एक शफिक याने रज्जाक यांना घट्ट पकडून ठेवले, तर आरोपी क्रमांक दोन अब्दल्ला याने हातातील लोखंडी फायटरने त्यांच्या डोक्यात, चेहऱ्यावर, छातीवर आणि पाठीवर फटके मारले. या मारहाणीत रज्जाक खाली जमिनीवर पडले.
यानंतर शफिक याने पुन्हा ‘तुझी मर्डर करतो’ अशी धमकी देत पॅन्टमध्ये लपवलेला चाकू बाहेर काढून रज्जाक यांच्या अंगावर उगारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रज्जाक यांनी त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीच्या हातातील चाकू रज्जाक यांच्या कपाळाला लागल्याने दुखापत होऊन रक्तस्राव झाला.
घटनेनंतर तेथील साक्षीदार आणि ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून रज्जाक यांची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. या प्रकरणाची रुग्णालयातील एमएलसी क्रमांक ३११६/२०२६ अशी नोंद करण्यात आली.
रज्जाक हमजा साब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ ऑक्टोबर रोजी पहाटे १.२५ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ११८(१), ३५१(३) आणि ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













