चिपळूण : 17 वर्षीय मुलाचा रुग्णालयात गळफास, घटनेने खळबळ

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील वहाळ घडशीवाडी येथे एका १७ वर्षीय मुलाने रुग्णालयात गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. साहिल सुरेश भागडे (वय १७ वर्षे ८ महिने, रा. वहाळ घडशीवाडी, ता. चिपळूण) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेची नोंद सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास साहिल हा वहाळ येथील डॉ. विजय सहस्त्रबुद्धे यांच्या आनंदी नर्सिंग होममध्ये पेशंटची नोंद करण्यासाठी गेला होता. काही वेळानंतर तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली.

साहिल रात्री सुमारे ८.४५ वाजताही घरी परतला नसल्याने, त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेण्यासाठी रुग्णालयात गेले. त्यावेळी रुग्णालयात साहिलचा शोध घेतला असता तो पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

ही बाब समोर आल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांना माहिती देण्यात आली. डॉ. विजय सहस्त्रबुद्धे यांनी रात्री सुमारे ९.१५ वाजता साहिलची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावर्डे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक २३/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, साहिलने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबतची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. पोलिसांकडून घटनेचा तपास करण्यात येत असून, त्यातून या घटनेमागील परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

रुग्णालयातच १७ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने वहाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *