लांज्यात शेतजमिनीच्या वादातून प्रौढाला बेदम मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा

banner 468x60

लांजा येथे शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ५४ वर्षीय प्रौढाला कोयत्याच्या पाठीमागील भागाने मारहाण करत तसेच झाडावर डोके आपटून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना लांजा तालुक्यातील असोडे येथे घडली. या हल्ल्यात विजय सिताराम पवार (वय ५४, रा. असोडे, पोस्ट मठ, ता. लांजा) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन ओळखीच्या व्यक्तींसह चार अनोळखी अशा एकूण सहा जणांविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय पवार हे २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास जमीन गट क्रमांक ८४ मधील आपल्या शेतीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते शेजारील मंगेश डोंगरे यांच्या जमिनीतील आंब्याच्या कलमाखाली उभे राहून गप्पा मारत होते.

याचदरम्यान सहा जण तेथे आले. त्यापैकी गोपीनाथ सावंत याने विजय पवार यांना शेतात पाऊल न ठेवण्याची तंबी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर त्याने कोयत्याच्या पाठीमागील भागाने पवार यांच्या पाठीवर प्रहार केल्याचा आरोप आहे. तसेच, “दावा संपायच्या आधी तुला संपवून टाकू,” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

यानंतर निखिल डोंगरे याने हाताच्या ठोशाने मारहाण करून घरात येऊन मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. जमावातील चार अनोळखी व्यक्तींनी विजय पवार यांचे केस व मान पकडून थपडा मारल्याचे, तर त्यापैकी एका व्यक्तीने त्यांचे डोके सागाच्या झाडावर आपटल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या मारहाणीत इतर व्यक्तींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.

घटनेनंतर जखमी विजय पवार यांनी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून गोपीनाथ सावंत, निखिल डोंगरे यांच्यासह चार अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद असून, घटनेचा पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत. आरोपींची भूमिका आणि घटनेतील नेमकी परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *