रत्नागिरी : मांडवी बीचवर 19 वर्षीय तरुणावर लोखंडी फायटरने हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी येथे मित्राला फोनवरून केलेल्या शिवीगाळीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणावर मांडवी समुद्रकिनारी लोखंडी फायटरने मारहाण केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली. या हल्ल्यात स्वरूप रूपेश दोरखंडे (वय १९, रा. साईनगर, फणसोप हायस्कूल मागे, वरचा फणसोप, रत्नागिरी) हा तरुण जखमी झाला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित रोहन ठिक (वय १९, रा. कोळंबे) याने स्वरूपचा मित्र यश पवार याला फोनवरून शिवीगाळ केली होती. याबाबत स्वरूपने रोहनला फोन करून जाब विचारला असता, त्याने स्वरूपलाही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर हा वाद समोरासमोर चर्चा करून मिटवण्याचे ठरले.

त्यानुसार १ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्वरूप हा मित्र यश पवार याच्यासह मांडवी समुद्रकिनारी पोहोचला. त्यावेळी रोहन ठिक हा आपल्या काही मित्रांसह तेथे उपस्थित होता. दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू असताना सोहम पड्यार (वय १९, रा. पावस) याने वादात हस्तक्षेप करून स्वरूपला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.

यानंतर रोहन ठिक यानेही स्वरूपला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याचदरम्यान सोहम पड्यार याने हातातील लोखंडी फायटरने स्वरूपच्या तोंडावर, डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत स्वरूप जखमी झाला.

घटनेनंतर स्वरूप दोरखंडे याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.०६ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७८/२०२६ नुसार रोहन ठिक आणि सोहम पड्यार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *