खेड आणि पूर्णगड येथून 24 तासांत दोन 22 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा संशय, पोलिसांकडून शोध सुरू

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात अवघ्या २४ तासांच्या अंतराने दोन २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोन्ही प्रकरणांत अज्ञात व्यक्तींनी फूस लावून किंवा बेकायदेशीररीत्या पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, खेड आणि पूर्णगड पोलिस ठाण्यांत भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना खेड तालुक्यातील दाभिळ नाका, सातवीन गाव येथे घडली. येथील सिंधुरा सचिन कानकुटे (वय २१) या २८ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता घरातून बाहेर पडल्या. मात्र, त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. संपर्क होऊ न शकल्याने पती सचिन भगवान कानकुटे (वय २८) यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तीने त्यांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

दुसरी घटना पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. गावडे आंबेरे, हनुमानवाडी येथील सानिया दामोदर नाटेकर (वय २१) ही तरुणी २९ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता मोबाईलचा डिस्प्ले बदलण्यासाठी रत्नागिरीला जात असल्याचे सांगून घरातून निघाली. मात्र, ती बराच वेळ उलटूनही घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा तसेच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर तिची आई दामिनी दामोदर नाटेकर (वय ४५) यांनी पूर्णगड पोलिसांत तक्रार दाखल केली.

या दोन्ही प्रकरणांत BNS 2023 मधील कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तींविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही तरुणींचा शोध घेण्यासाठी संबंधित पोलिसांकडून तपास सुरू असून, त्यांच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण आणि त्या सध्या कुठे आहेत, याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, अवघ्या एका दिवसाच्या अंतराने जिल्ह्यात दोन तरुणी बेपत्ता झाल्याने या घटनांकडे पोलिसांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे. पोलिस तपासातूनच या घटनांमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *