रत्नागिरी : रेल्वेस्थानकावर ‘ऑपरेशन सतर्क’ची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या दारूच्या 109 बाटल्या जप्त

banner 468x60

रत्नागिरी येथे रेल्वेतून होणाऱ्या बेकायदेशीर दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) राबवलेल्या ‘ऑपरेशन सतर्क’ मोहिमेअंतर्गत रत्नागिरी रेल्वेस्थानकावर मोठी कारवाई करण्यात आली. ट्रेन क्रमांक १२४४९ गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून गोवा बनावटीच्या दारूच्या १०० छोट्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

बुधवार, ३० सप्टेंबर रोजी गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस रत्नागिरी रेल्वेस्थानकावर दाखल झाल्यानंतर आरपीएफच्या पथकाकडून नियमित तपासणी सुरू होती. यावेळी इंजिनच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या जनरल डब्यात एक संशयास्पद बेवारस बॅग आढळून आली.

आरपीएफच्या जवानांनी डब्यातील प्रवाशांकडे बॅगेबाबत चौकशी केली. मात्र, कोणत्याही प्रवाशाने सदर बॅगवर आपला दावा केला नाही. त्यामुळे संशय बळावल्याने आरपीएफने बॅग ताब्यात घेत ती रत्नागिरी येथील आरपीएफ पोस्टवर आणली.

त्यानंतर पंचांसमक्ष बॅग उघडून तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या १०० छोट्या बाटल्या आढळून आल्या. आरपीएफने दारूसाठा जप्त केला असून, त्याची वाहतूक करणारी व्यक्ती कोण, याचा शोध घेण्यासाठी पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

रेल्वे मार्गाचा वापर करून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीविरोधात आरपीएफकडून तपासणी आणि कारवाई अधिक तीव्र करण्यात आल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *