रत्नागिरी : दोन अपहरणाच्या घटना, महिला आणि 26 वर्षीय तरुण बेपत्ता

banner 468x60

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपहरणाच्या घटना घडल्याची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांत अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुभाष रोड, श्रीराम टॉकीजसमोर, रत्नागिरी येथे घडली. फिर्यादी शिवाजी मारुती मोरस्कर (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नी आरती शिवाजी मोरस्कर (वय ४३) यांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून पळवून नेल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३७७/२०२६ दाखल करण्यात आला असून, २९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.५६ वाजता गुन्ह्याची नोंद झाली.

दुसरी घटना २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हिंद कॉलनी, शिवाजी स्टेडियमजवळील कन्स्ट्रक्शन परिसरात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादी सुनंदा रमेश बजंत्री (वय ३५) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा परशराम रमेश बजंत्री (वय २६) याला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून पळवून नेल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३७६/२०२६ भारतीय न्यायसंहिता कलम १४०(३) अन्वये दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपी अज्ञात असून, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, दोन्ही घटनांमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *