मुंबई–गोवा महामार्गालगत आगवे येथे अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून तब्बल १ लाख ४ हजार ९ रुपये किमतीचा माल व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगवे येथे पॅसिफिक हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या साईटजवळ ‘साई मोटार अँड स्पेअर पार्ट’ नावाचे दुकान व गॅरेज आहे. हे दुकान २८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता बंद करण्यात आले होते. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी गेल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. दुकानात विक्रीसाठी ठेवलेले विविध वाहनांचे स्पेअर पार्ट्स आणि ऑईल चोरून नेण्यात आले. यामध्ये Valvoline कंपनीचे ऑईल बकेट व कॅन, बॉल जॉईंट सेट, बोलेरो टायर रॉड एन्ड सेट, क्लच सेट, बोलेरो टू-इन-वन क्लच सेट, ब्रेक बूस्टर, ब्रेक रोटर, ब्रेक लाइनिंग सेट, डिस्क पॅकिंग रोटर आदी साहित्याचा समावेश आहे.
याशिवाय दुकानातील ३ हजार रुपये रोख रक्कमही चोरीला गेली आहे. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत १ लाख ४ हजार ९ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी दुकानमालक वैभव प्रभाकर डोगरे (वय ४५, रा. मांडकी कासारवाडी, ता. चिपळूण) यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी नेमकी कोणत्या व्यक्तीने केली, याचा तपास सावर्डे पोलीस करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











