लांजा : आंजणारी येथे 12 चाकी ट्रकचा अपघात, चालक जागीच ठार, ट्रक अपघातप्रकरणी मृत चालकावर गुन्हा दाखल

banner 468x60

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील आंजणारी पळ येथे १२ चाकी टाटा ट्रकचा भीषण अपघात झाला. उतारावर भरधाव वेगात असलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर क्लिनर गंभीर जखमी झाला. ही घटना ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात ५ सप्टेंबर रोजी पहाटे ३.४० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक शाम सिंग (वय ५८, रा. सुकरताल, सहारनपूर, उत्तर प्रदेश) हा १२ चाकी टाटा ट्रक क्रमांक एचआर ३८ एक्स ०९९३ मधून स्लायडिंगचा माल घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. आंजणारी पळ येथील उताराच्या रस्त्यावर त्याने वाहनाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक अतिवेगाने चालविल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

त्यानंतर ट्रकचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चालक शाम सिंग यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकमधील क्लिनर संदिप कृषणलाल कुमार (वय ४१, रा. सहारनपूर, उत्तर प्रदेश) यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

अपघातात ट्रकसह त्यामध्ये वाहून नेण्यात येत असलेल्या मालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमी क्लिनर संदिप कृषणलाल कुमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *