रत्नागिरी येथे मांजर हरवल्याच्या चर्चेतून सुरू झालेल्या वादाचे रूप हाणामारीत झाले असून, आरे गावात एका कुटुंबावर जमाव करून मारहाण केल्याप्रकरणी १४ जणांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत.
ही घटना शनिवारी, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घराजवळ, पाखाडी परिसरात तसेच कालभैरव मंदिरासमोर, आरे येथे घडली. याप्रकरणी प्रसाद प्रकाश कदम (वय ३७, रा. कदमवाडी, आरे) यांनी तक्रार दिली असून, रविवारी दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५७ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद कदम व त्यांची पत्नी पूर्वा हे घराबाहेर रस्त्यावर त्यांचे मांजर हरवल्याबाबत चर्चा करत होते. त्यावेळी आरोपींपैकी एका महिलेने त्यांचे बोलणे ऐकून, “तुमचे मांजर आम्ही मारले का?” अशी विचारणा करत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. फिर्यादींनी आपण कोणाचेही नाव घेतले नसल्याचे सांगितल्यानंतर वाद वाढला. त्यानंतर संबंधित घरातून इतर आरोपी बाहेर येऊन फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करू लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जाण्यासाठी घराबाहेर पडले. कदमवाडी चव्हाट्याजवळ आल्यानंतर पाखाडी परिसरात साफसफाई सुरू असताना एका कामगाराचा धक्का फिर्यादींच्या पत्नीला लागल्याने पुन्हा वाद निर्माण झाला. यावेळी फिर्यादींचे भाऊ पंकज यांनी विचारणा केली असता संबंधित कामगाराने चुकून धक्का लागल्याचे सांगत माफी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मात्र, यानंतर आरोपींपैकी एकाने फिर्यादीला शिवीगाळ करत मारण्यासाठी अंगावर धावून येत कटर ब्लेडने त्यांच्या अंगावर ओरबडून मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपींनी पाखाडी परिसरात जमाव करून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. एका आरोपीने फिर्यादीच्या कपाळाच्या उजव्या बाजूस दगड मारल्याचा, तर एका महिला आरोपीने फिर्यादींच्या पत्नी पूर्वा यांच्या ढोपरावर काठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय कालभैरव मंदिराजवळ पार्क केलेल्या गाडीकडे जात असताना काही आरोपींनी फिर्यादींचे भाऊ पंकज यांना पकडून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच एका आरोपीने फिर्यादीच्या डोक्यावर व नाकावर मारहाण केली. फिर्यादींच्या पत्नी पूर्वा यांनाही काही आरोपींनी नाकावर हाताने मारहाण करून पायावर लाथा मारल्याचा आरोप आहे.
या मारहाणीत प्रसाद प्रकाश कदम, पूर्वा प्रसाद कदम, पंकज प्रकाश कदम आणि प्रतिक्षा प्रकाश कदम हे चौघे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी दिपाली दिलीप कदम, विदेश भालचंद्र कदम, मयुरेश पांडुरंग आरेकर, संदेश मधुकर कदम, आदेश भालचंद्र कदम, सुष्मा मधुकर कदम, साक्षी सुरेश कदम, पल्लवी आदेश कदम, अस्मिता आनंद पेडणेकर, अपेक्षा भालचंद्र कदम, साहिल राम शिवलकर, सागर राम शिवलकर, आनंद पेडणेकर व रत्नकांत बाबराव मयेकर (सर्व रा. आरे, ता. जि. रत्नागिरी) यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













