गुहागर शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरातून ४५ वर्षीय व्यक्ती घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. नातेवाईकांनी परिसरासह सर्वत्र शोध घेऊनही संबंधित व्यक्तीचा ठावठिकाणा लागला नसल्याने त्यांच्या अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र बाळकृष्ण रहाटे (वय ४५, रा. छत्रपती शिवाजी चौक, गुहागर, जि. रत्नागिरी) हे २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले. ते मनोरुग्ण असल्याचेही पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
महेंद्र रहाटे घरातून निघून गेल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी तसेच परिचितांनी आजूबाजूच्या परिसरात आणि नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही ते कुठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांना कोणीतरी अज्ञात इसमाने गुप्तपणे व गैरकायदेशीररीत्या घेऊन गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुधाकर मधुकर सांगळे (वय ५७, व्यवसाय रिक्षाचालक, रा. वरचापाट दुर्गादेवीवाडी, गुहागर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा रजिस्टर क्रमांक ८३/२०२६ अन्वये हा गुन्हा ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.०४ वाजता दाखल करण्यात आला असून, बेपत्ता महेंद्र रहाटे यांचा शोध घेण्यासह प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













