रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी रत्नागिरी पोलिसांची विशेष तयारी, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक संपन्न

banner 468x60

आगामी गणेशोत्सव रत्नागिरी जिल्ह्यात शांततापूर्ण, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा तसेच उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने विशेष तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली.

ही बैठक दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक . अभिजीत थोरात, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक . नितीन ढेरे यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भात पोलीस अधीक्षक. नितीन बगाटे यांनी सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध समस्या, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा करण्यात आली. उत्सवाच्या काळात उद्भवू शकणाऱ्या अडचणींचे वेळीच निराकरण करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीदरम्यान सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी शासन, प्रशासन तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. विशेषतः ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करणे, वाहतूक व्यवस्थेला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे, मंडप उभारणी व विद्युत व्यवस्थेमध्ये आवश्यक ती सुरक्षितता राखणे, अग्निसुरक्षेच्या उपाययोजना करणे तसेच सार्वजनिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे, याबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव असल्याने उत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि शांतता कायम राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच संभाव्य अडचणींवर तातडीने तोडगा काढता यावा, यासाठी रत्नागिरी पोलीस दल आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिक, सार्वजनिक गणेश मंडळे आणि पोलीस प्रशासन यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास हा उत्सव अधिक सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात साजरा करता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळे व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून आगामी गणेशोत्सव आनंद, उत्साह, शांतता आणि सुरक्षिततेच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *