दापोली : रामराजे महाविद्यालयात रानभाज्यांपासून बनवलेल्या नाविन्यपूर्ण पाककृतींचे प्रदर्शन

banner 468x60

कोकणच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची आणि पारंपरिक रानभाज्यांची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने रामराजे महाविद्यालयाच्या वतीने रानभाज्यांपासून तयार केलेल्या नाविन्यपूर्ण पाककृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ८ सप्टेंबर २०२७ रोजी सकाळी ११ वाजता रामराजे महाविद्यालयात होणार आहे.

कोकणच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या पारंपरिक रानभाज्यांचा आहारातील वापर वाढावा, त्यांचे पौष्टिक महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे आणि या स्थानिक खाद्यपरंपरेचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

प्रदर्शनामध्ये भारंगी, टाकळा, कुरडू, करटोली, चिचार्डी, प्याव, दार, शतावरी आदी विविध रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या चविष्ट आणि नाविन्यपूर्ण पाककृती मांडण्यात येणार आहेत. पारंपरिक रानभाज्यांना आधुनिक पाककलेची जोड देऊन विविध पदार्थ तयार करण्यात येणार असल्याने हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार आहे.

यासोबतच या रानभाज्यांमध्ये असलेली जीवनसत्त्वे, खनिजे, पौष्टिक घटक तसेच त्यांचे आरोग्यदायी फायदे याबाबतची माहितीही प्रदर्शनामध्ये आकर्षक पद्धतीने सादर केली जाणार आहे. त्यामुळे रानभाज्यांचा आहारातील समावेश, आरोग्यदायी जीवनशैली आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचे जतन याबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ‘नानीचो वाडो’ कृषी पर्यटन संस्थेचे स्मितेश तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे, रामराजे महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. संदीप राजपुरे, तालुका कृषी अधिकारी हेमंत ठोंबरे, संस्थेच्या अध्यक्षा स्मिताली राजपुरे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक हर्डीकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कोकणच्या मातीत रुजलेल्या पारंपरिक रानभाज्यांना आधुनिक पाककलेची जोड देत तयार करण्यात आलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याची तसेच त्यांच्या पौष्टिक व आरोग्यदायी महत्त्वाची माहिती जाणून घेण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून दापोलीकरांना मिळणार आहे.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला दापोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रामराजे महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : रामराजे महाविद्यालय, दापोली
दिनांक : ८ सप्टेंबर २०२७
वेळ : सकाळी ११ वाजता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *