रत्नागिरी : फणसवळेच्या जंगलात गोवंश कत्तलीचा पर्दाफाश, पोलिसांवर हत्यार उगारण्याचा प्रयत्न, ग्रामीण पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई, दोघे ताब्यात, तिसरा संशयित जंगलात फरार

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी हद्दीतील करबुडे हायवेजवळ फणसवळे-मधलीवाडी (खुरीचा आंबा) परिसरातील जंगलात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा प्रकार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, तिसरा संशयित अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके जंगल परिसरात तैनात करण्यात आली आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पालवे हे आपल्या पथकासह गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना वेतोशी हद्दीतील करबुडे हायवेजवळ फणसवळे-मधलीवाडी परिसरात गोवंश कत्तलीचा प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पालवे यांनी क्षणाचाही विलंब न करता पथकासह घटनास्थळाकडे धाव घेतली. मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर जंगलाच्या आडोशाला संशयितांकडून हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. परिसरात अंधार असल्याने पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने सापळा रचून कारवाई सुरू केली.

दरम्यान, पोलिसांना पाहताच संशयितांनी विरोध करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील एका संशयिताने पोलिसांवर हत्यार उगारल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि एका संशयिताला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेत दुसरा संशयित पसार झाला होता. त्याचा पोलिसांनी सकाळपासून शोध घेत शिताफीने ताब्यात घेतले. मात्र, तिसरा संशयित अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना मोठ्या प्रमाणावर गोवंश मांस आढळून आले. हे मांस पोलिसांनी जप्त केले असून, घटनास्थळावरील अन्य साहित्य व पुरावेही तपासाच्या दृष्टीने ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. फरार संशयिताचा शोध घेण्यासाठी जंगल परिसरात पोलिसांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

या कारवाईदरम्यान स्थानिक ग्रामस्थांनीही पोलिसांना सहकार्य केले. सकाळी घटनास्थळी सरपंच निलेश लोंढे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष आंबेकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल पवार, पोलीस पाटील विष्णू ठीक, ऋतुजा आंबेकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, पोलिसांच्या कारवाईला विरोध करत हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हत्यार उगारण्याचे धाडस नेमके कुणाच्या बळावर करण्यात आले, असा सवाल उपस्थित होत आहे.

या प्रकरणाचा तपास केवळ ताब्यात घेतलेल्या संशयितांपुरता मर्यादित न ठेवता, या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, कत्तलीसाठी जनावरे कुठून आणली जात होती, या प्रकारासाठी कोण आर्थिक किंवा अन्य स्वरूपाचे सहकार्य करत होते आणि यामागे मोठे जाळे कार्यरत आहे का, याचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.

सकल हिंदू समाज, रत्नागिरी यांच्याकडूनही या घटनेतील दोषींवर कोणताही मुलाहिजा न ठेवता कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांच्या कायदेशीर कारवाईला पूर्ण पाठिंबा देत या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या घटनेमुळे फणसवळे, मधलीवाडी, वेतोशी आणि करबुडे परिसरात खळबळ उडाली असून, फरार संशयिताच्या अटकेसह या संपूर्ण प्रकारामागील सूत्रधार कोण, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *