गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई आणि मडगावदरम्यान चार अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्यांच्या एकूण चार फेऱ्या होणार असून, प्रत्येक दिशेने दोन फेऱ्या धावतील.
गाडी क्रमांक ०१००७ सीएसएमटी-मडगाव गणपती स्पेशल ११ आणि १३ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री १२.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०१००८ मडगाव-सीएसएमटी स्पेशल ११ आणि १३ सप्टेंबर रोजी मडगावहून सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
या विशेष गाड्यांना कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामध्ये पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि थिविम रोड यांचा समावेश आहे.
विशेष गाडीला एकूण २२ डबे असतील. यामध्ये २ एसी ३-टियर, १२ स्लीपर क्लास, ६ जनरल सेकंड क्लास आणि २ सेकंड सीटिंग-कम-गार्ड ब्रेक व्हॅन डबे असतील. त्यामुळे प्रवाशांना विविध श्रेणींमध्ये प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, ०१००७ गणपती राखीव विशेष गाडीचे बुकिंग २९ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. आरक्षित तिकिटांसाठी प्रवासी आयआरसीटीसी वेबसाइट किंवा RailOne ॲपचा वापर करू शकतात. अनारक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट घेता येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकण आणि गोव्याकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी रवाना होतात. त्यामुळे मध्य रेल्वेच्या या अतिरिक्त सेवांमुळे नियमित गाड्यांवरील प्रवासी ताण कमी होण्यास मदत होणार असून, चाकरमान्यांना कोकण प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













