चिपळूण : रवींद्र सुर्वे खून प्रकरणात मुख्य आरोपीला हायकोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बहुचर्चित रवींद्र सुर्वे खून प्रकरणातील मुख्य आरोपी संजय विनायक सुर्वे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य, प्राणघातक शस्त्रांचा वापर आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबातील महत्त्वाचे पुरावे विचारात घेत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने यापूर्वी जामीन नाकारल्यानंतर संजय सुर्वे याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयानेही त्याला दिलासा न देता तुरुंगातील कोठडी कायम ठेवली.

२४ ऑगस्ट २०२३ रोजी रवींद्र सुर्वे यांचा मृतदेह त्यांच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. या घटनेने चिपळूण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिस तपासात घटनेच्या रात्री संजय सुर्वे, सहआरोपी वसंत हिलाम आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मंगेश मोहिते हे एकत्र मद्यप्राशन करत असल्याचे समोर आले. मोबाईल फोनवरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संजय सुर्वे याने तलवारीने रवींद्र सुर्वे यांच्या डोक्यावर, कमरेवर आणि हातावर वार केल्याचा आरोप आहे. तर सहआरोपीने लोखंडी पाईपने मारहाण केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

घटनेनंतर २५ ऑगस्ट २०२३ रोजी पोलिसांनी मुख्य आरोपी संजय सुर्वे याला अटक केली होती.

दरम्यान, खटल्याची सुनावणी सध्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू आहे. जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी बचाव पक्षाने साक्षीदारांच्या जबाबातील कथित विरोधाभास आणि तपासातील त्रुटींचा आधार घेत आरोपीच्या सुटकेची मागणी केली. मात्र, सरकारी पक्षाने गुन्ह्याचे गांभीर्य, आरोपीविरोधातील उपलब्ध पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या जबाबाचा आधार घेत जामिनाला जोरदार विरोध केला.

मृतदेह आरोपीच्या ताब्यातील जागेत सापडणे, शरीराच्या महत्त्वाच्या भागांवर गंभीर वार झाल्याचे वैद्यकीय पुरावे, दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेले जबाब आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष या बाबींची न्यायालयाने दखल घेतल्याचे सांगण्यात आले.

उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याने आरोपीला सध्या तुरुंगातच राहावे लागणार असून, या निर्णयामुळे रवींद्र सुर्वे यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *