चिपळूण-संगमेश्वरातील 719 शेतकरी पात्र, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

banner 468x60

कोकणातील शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शेखर निकम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी कोकण विभागाची स्वतंत्र विशेष सोडत जाहीर करण्यात आली असून, चिपळूण तालुक्यातील ३३१ आणि संगमेश्वर तालुक्यातील ३८८, अशा एकूण ७१९ शेतकऱ्यांची निवड झाली आहे.


महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज करूनही राज्यस्तरीय सोडतीत संधी न मिळाल्याने कोकणातील अनेक शेतकरी पूर्वसंमतीच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे ट्रॅक्टर, पॉवर टिलर तसेच आधुनिक कृषी अवजारांचा लाभ मिळण्यास विलंब होत होता.
कोकणाची डोंगराळ भौगोलिक परिस्थिती, भातशेतीचे स्वरूप आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी लक्षात घेऊन कोकणासाठी स्वतंत्र सोडत काढण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार शेखर निकम यांनी शासन व कृषी विभागाकडे केली होती. यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.


या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत कोकण विभागासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेची विशेष स्वतंत्र सोडत जाहीर केली आहे.
या निर्णयामुळे चिपळूण-संगमेश्वरातील ७१९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आधुनिक कृषी अवजारांच्या माध्यमातून शेती अधिक सुलभ, कार्यक्षम आणि यांत्रिक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण प्रश्नाला न्याय मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *