चिपळूण : सावर्डेत गणेशोत्सवपूर्व नागरी समस्यांवर चर्चा, अधिकाऱ्यांसह संयुक्त बैठक

banner 468x60

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावर्डे परिसरातील विविध नागरी समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी सावर्डे ग्रामपंचायत, व्यापारी संघटना आणि संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली.

बैठकीत सावर्डे बाजारपेठेतील रस्त्यांची दुरुस्ती, मुंबई-गोवा महामार्गावरील आरती स्वीटसमोरील धोकादायक खड्डा, ब्रिटिशकालीन जुन्या पुलाचे ऑडिट, सर्व्हिस रोडवरील तुटलेले गटार स्लॅब, वाढलेले गवत तसेच खड्डे व उखडलेले डांबरीकरण यांसह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

महामार्गावरील पथदिव्यांची अनियमितता, आवश्यक ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था तसेच बसस्थानकातील वर्षभरापासून मोडकळीस आलेल्या पिकअप शेडच्या दुरुस्तीचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. महामार्गाचे ठेकेदार प्रतिनिधी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

याशिवाय पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीजपुरवठा, एसटी थांब्यांची निश्चिती, वाहतूक नियोजन आणि गणेशोत्सव काळातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना यावरही सविस्तर चर्चा झाली.

बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभाग, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, ग्रामपंचायत प्रशासन तसेच अन्य संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य शौकतभाई माखजनकर, माजी सरपंच समीक्षा बागवे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ, व्यापारी, पदाधिकारी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात सावर्डे परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त ठेवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *