दापोलीत मंगळागौर स्पर्धेचा जल्लोष; ‘मैत्री ग्रुप’ प्रथम, मंत्री योगेश कदम आणि श्रेया कदम यांची उपस्थिती

banner 468x60

श्रावणानिमित्त दापोली तालुक्यात भव्य मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांना आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देत दापोली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तब्बल आठ तास रंगलेल्या या चुरशीच्या स्पर्धेत दापोली तालुक्यातील २० महिला समूहांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

उत्कृष्ट सादरीकरण करत ‘मैत्री ग्रुप’ने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना ३५ हजार रुपये रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देण्यात आले. ‘झिम्मा क्वीन’ समूहाने द्वितीय क्रमांक मिळवत २५ हजार रुपये, तर ‘काळकाई महिला ग्रुपने तृतीय क्रमांक मिळवत १५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह पटकावले.

banner 728x90

ग्रामीण लोकजीवन आणि लोककलेच्या अभ्यासक वर्षा भट (दिवेआगर) आणि अर्चना जोशी (रत्नागिरी) यांनी स्पर्धेचे काटेकोर परीक्षण केले.

या सांस्कृतिक सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या श्रेयाताई कदम यांनी सहभागी महिलांसोबत मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत महिलांचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी बोलताना त्यांनी दापोलीच्या नाट्यगृहासाठी शासनाने मंजूर केलेल्या १५ कोटी रुपयांच्या निधीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री योगेश कदम यांचे आभार मानले.

पुढील वर्षी ही भव्य मंगळागौर स्पर्धा दापोलीतील हक्काच्या वातानुकूलित नाट्यगृहात आयोजित केली जाईल, असा विश्वास श्रेयाताई कदम यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात महिलांच्या कलागुणांना आणि सांस्कृतिक उपक्रमांना अधिक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

मंत्री योगेश कदम यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून पारंपरिक लोककला आणि लोकपरंपरा जपत एकत्र आलेल्या महिलांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याला नगराध्यक्षा कृपा घाग, महिला आघाडी प्रमुख दीप्ती निखार्गे, माजी जि.प. अध्यक्षा रोहिणी दळवी, माजी समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर, पं.स. सदस्य ममता शिंदे, रसिका पेठकर, कीर्ती परांजपे, रिया सावंत यांच्यासह शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सखी शरद यांनी केले. पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांना नव्या पिढीसमोर सादर करणारी ही स्पर्धा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न ठरता महिलांच्या कलागुणांना वाव देणारी आणि महिला शक्तीला एकत्र आणणारी सांस्कृतिक चळवळ ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *