दापोली सायकलिंग क्लबचे सायकलपटू शरद भुवड (पंचनदी) यांनी ३ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत मनाली ते झांस्कर-लेह लडाख अशी खडतर सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. विशेष म्हणजे ही सेल्फ-सपोर्टेड सायकल मोहीम होती. म्हणजेच प्रत्येक सायकलस्वाराने आवश्यक सामान स्वतःच्या सायकलवर घेऊन हा प्रवास केला.

या मोहिमेत आदित्य दास, सुप्रिय फले, अनिल गडगे, जनार्दन वैद्यनाथन आणि शरद भुवड या पाच सायकलस्वारांचा सहभाग होता.
गाडीच्या काचेतून हिमालयाचा निसर्ग पाहणे आणि सायकलच्या हँडलवर पकड घट्ट ठेवत, बोचऱ्या थंड वाऱ्याचा सामना करत हिमालयातील चढण पार करणे, हा अनुभव पूर्णपणे वेगळा असल्याचे शरद भुवड यांनी सांगितले. मनाली, लाहौल आणि झांस्कर खोऱ्यातील दुर्गम आणि आव्हानात्मक रस्ते जगभरातील सायकलस्वारांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

या प्रवासाविषयी अनुभव सांगताना शरद भुवड म्हणाले की, “सायकलच्या प्रत्येक पेडलसोबत बदलणारे निसर्गाचे रूप आणि वाढत जाणारी श्वासांची गती हा अनुभव शब्दांत मांडता येणार नाही.”
मनालीच्या हिरव्यागार दऱ्यांमधून सुरू झालेल्या या मोहिमेत कोठी, मढी, रोहतंग पास, कोकसर, त्रिलोकीनाथ, कीलाँग, शिंकुला पास, झांस्कर सुम्दो, गोम्बो रांझन, पुराने, फुगताल, पदुम, कर्शा मॉनेस्ट्री, लेह-लडाख आणि खार्दुंगला अशा विविध दुर्गम आणि उंच ठिकाणांचा समावेश होता. या संपूर्ण मोहिमेत ६०० हून अधिक किलोमीटरचा सायकल प्रवास करण्यात आला.
१७,९८२ फुटांवरील खार्दुंगला ठरला सुवर्णक्षण
या मोहिमेतील सर्वात थरारक आणि आव्हानात्मक टप्पा म्हणजे लेहहून खार्दुंगला टॉपकडे केलेली चढाई. सुमारे १७,९८२ फूट उंचीवर असलेल्या खार्दुंगला टॉपपर्यंत पोहोचताना सायकलस्वारांची अक्षरशः कसोटी लागली. तब्बल ८४ किलोमीटरच्या या खडतर आणि उंचावरील मार्गावर प्रत्येक पेडलसाठी प्रचंड जिद्द आणि मानसिक ताकद आवश्यक होती.
खार्दुंगला टॉपवर स्वतःची सायकल उभी राहिल्याचा क्षण हा आयुष्यातील सुवर्णक्षण असल्याची भावना शरद भुवड यांनी व्यक्त केली.
हिमालयातील हा सायकल प्रवास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही आव्हानात्मक होता. थकलेले पाय, फुलणारा श्वास आणि सतत बदलणारे हवामान यांचा सामना करत केवळ स्वतःच्या ताकदीवर हा प्रवास पूर्ण करण्यात आला. इंजिनची मदत न घेता हिमालयातील उंच शिखरे आणि खडतर मार्ग सायकलवरून पार करत शरद भुवड आणि त्यांच्या टीमने जिद्द, साहस आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडविले आहे.
ही थरारक सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल शरद भुवड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













