कृषी महाविद्यालय, दापोली येथील रावे उपक्रमांतर्गत ‘कृषी संगिनी’ आणि ‘संजीवनी’ समूहांच्या संयुक्त विद्यमाने साखळोली नं. २ येथे ‘रानमाया’ प्रदर्शन आणि पाककला स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा वारसा जपण्यासोबतच रानभाज्यांचे संवर्धन, त्यांचे औषधी गुणधर्म आणि पोषणमूल्ये ग्रामीण भागातील नागरिकांसह नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन साखळोलीच्या सरपंच सौ. शामल लांजेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी रानभाज्यांचे जतन आणि त्यांचा प्रचार-प्रसार करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच कृषीकन्यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
४० प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शनात
‘रानमाया’ प्रदर्शनात तब्बल ४० प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले होते. प्रत्येक रानभाजीची ओळख, तिचे औषधी उपयोग आणि पोषणमूल्ये यांची माहिती देणारे फलक प्रदर्शनात लावण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थांना परिसरात उपलब्ध असलेल्या विविध रानभाज्यांची माहिती प्रत्यक्ष पाहता आणि समजून घेता आली.
यासोबतच पाककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पारंपरिक तसेच नावीन्यपूर्ण अशा ३५ विविध पदार्थांचे सादरीकरण करण्यात आले. स्थानिक रानभाज्यांचा दैनंदिन आहारात उपयोग कसा करता येऊ शकतो, याचेही विविध पदार्थांमधून दर्शन घडले.
पाककला स्पर्धेतील विजेते
पाककला स्पर्धेत सौ. स्मिता पडवेकर यांनी केळीच्या कोक्याचे मोदक आणि आळंबीची भाजी सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. सौ. प्रणाली हरचिलकर यांनी भारंगीची पानवडी सादर करून द्वितीय क्रमांक मिळवला, तर सौ. मयुरी रामाणे यांनी भारंगीची वडी सादर करून तृतीय क्रमांक मिळवला.
उत्तेजनार्थ पारितोषिक रुचिका जामसुदकर यांना टाकळ्याचे लॉलीपॉप आणि बांबूच्या कोंबाचे काप या पदार्थांसाठी देण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला रावे समन्वयक डॉ. अशोककुमार चव्हाण, विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. वरवडेकर, विषय विशेषज्ञ डॉ. पालशेतकर, डॉ. प्रसादे, डॉ. रणजीत महाडिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे आणि डॉ. आशिष शिगवण यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. प्रवीण झगडे यांनी प्रास्ताविक करताना रानभाज्यांचे आहारातील महत्त्व तसेच त्यांच्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास होणारी मदत याबाबत मार्गदर्शन केले.
हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर आणि डॉ. अशोककुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रवीण झगडे, डॉ. आशिष शिगवण, कृषी सहाय्यक समीर उसरे, दृकश्राव्य चालक श्रीयश पवार, शिपाई चंद्रकांत साळवी तसेच ‘कृषी संगिनी’ आणि ‘संजीवनी’ समूहातील कृषीकन्यांनी परिश्रम घेतले.
या प्रदर्शनामुळे ग्रामस्थांना रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पोषणमूल्य आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीची नव्याने ओळख झाली. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचा आहारात वापर आणि त्यांचे संवर्धन याबाबतही नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













