चिपळूण तालुक्यातील प्रशासनाने जड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाबाबत आदेश जारी केलेला असतानाही त्याचे उल्लंघन करून अवजड ट्रक भरधाव वेगाने चालवून अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडपोली येथील सुकाई मंदिराजवळील वळणावर २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
राकेश संजय चव्हाण (वय २६, मूळ रा. शाहगड, आझमगढ, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिपळूणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी पिंपळी पूल परिसरातील वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था निश्चित करत जड वाहनांच्या वाहतुकीबाबत आदेश जारी केला होता.
मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून राकेश चव्हाण याने त्याच्या ताब्यातील अवजड ट्रक (एमएच ०६ बीडी ०८३२) गाणे खडपोली ते पेढंबे ब्रिज या मार्गावर भरधाव वेगाने नेला. खडपोली सुकाई मंदिराजवळील वळणावर ट्रक चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन नाल्याच्या कठड्यावर आदळला आणि तेथे अडकून पडला.
ट्रक अपघातग्रस्त झाल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून जड वाहन चालविल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सचिन आप्पासो कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २२ ऑगस्ट रोजी चालक राकेश चव्हाण याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील कलम २२३, २८१ आणि २८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेशाची अवज्ञा, निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि सार्वजनिक मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













