चिपळूण शहराजवळील वालोपे-गणेशवाडी येथे नदीकिनारी मगरीच्या तावडीत सापडलेल्या आईची प्रसंगावधान राखून धाडसाने सुटका करणाऱ्या १० वर्षीय स्वर्णी भूपेंद्र पवार हिचा जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणतर्फे तिच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
गुरुवार, दि. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी स्वर्णीची आई नंदिनी पवार (३५) या कपडे धुण्यासाठी वालोपे नदीकिनारी गणेश घाटावर गेल्या होत्या. त्या कपडे धुत असताना दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक त्यांच्या पायाचा जबड्यात पकड घेतला आणि त्यांना पाण्यात खेचण्याचा प्रयत्न केला.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नंदिनी यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांनी एका हाताने दगडाचा आधार घेतला, तर दुसरीकडे मगर त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी घटनास्थळी असलेल्या स्वर्णीने क्षणाचाही विलंब न करता आईचा हात घट्ट पकडला आणि पूर्ण ताकदीनिशी तिला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. नंदिनी यांनीही मगरीशी झुंज दिली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि नंदिनी यांची मगरीच्या तावडीतून सुटका झाली.
स्वर्णीच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे तिच्या आईचे प्राण वाचले. या शौर्याबद्दल तिचे कौतुक करण्यासाठी जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणचे अध्यक्ष तथा दैनिक सागरचे पत्रकार सुनील साळवी, कार्याध्यक्ष सतीश कदम, उपाध्यक्ष गजेंद्र खडपे, खजिनदार संतोष पिलके आणि सदस्य ललेश कदम यांनी स्वर्णीच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. यावेळी तिला भेटवस्तू तसेच रोख बक्षीस देण्यात आले.
यावेळी स्वर्णीने संपूर्ण प्रसंग कसा घडला आणि तिने आईला मगरीच्या तावडीतून कशा प्रकारे बाहेर काढले, याचा थरारक अनुभव सांगितला. तिच्या धाडसाचे उपस्थितांनी कौतुक केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













