खेड : एमईएस परशुराम हॉस्पिटलमध्ये विशेष रेटिना (फंडस) नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

banner 468x60

खेड तालुक्यातील एमईएस आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय तसेच एमईएस परशुराम हॉस्पिटल, घाणेखुंट-लोटे येथील शालाक्यतंत्र विभाग (नेत्ररोग विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी विशेष रेटिना (फंडस) नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत एमईएस परशुराम हॉस्पिटल, घाणेखुंट-लोटे येथे आयोजित करण्यात येणार आहे.

banner 728x90

या शिबिरामध्ये डोळ्यांच्या मागील भागातील रेटिनाची अत्याधुनिक डिजिटल तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी रुग्णाचा फंडस (रेटिना) फोटो घेण्यात येईल. कोकण विभागात विशेष उपलब्ध असलेल्या Appasamy कंपनीच्या अत्याधुनिक FOVI Lite Fundus Camera च्या माध्यमातून ही डिजिटल रेटिना स्क्रीनिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रेटिना छायाचित्रणामुळे डोळ्यांच्या मागील भागाची उच्च दर्जाची डिजिटल प्रतिमा मिळते. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दृष्टी कमी होण्याचा धोका निर्माण करणाऱ्या अनेक गंभीर नेत्रविकारांचे प्राथमिक अवस्थेत निदान करणे शक्य होते. तसेच आजाराचे निरीक्षण, उपचारांचे नियोजन आणि भविष्यातील तुलनेसाठी डिजिटल नोंद ठेवण्यास मदत होते.


अनेक नेत्रविकार सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे दाखवत नाहीत. त्यामुळे नियमित रेटिना तपासणी करणे महत्त्वाचे ठरते. या शिबिरामध्ये मधुमेह असलेले रुग्ण, उच्च रक्तदाब असलेले नागरिक, ४० वर्षांवरील व्यक्ती, धूसर किंवा अस्पष्ट दिसण्याची तक्रार असलेले रुग्ण, काचबिंदूचा कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्ती तसेच दृष्टी कमी होत असल्याची जाणीव असलेल्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फंडस तपासणीच्या माध्यमातून डायबेटिक रेटिनोपॅथी, ग्लॉकोमा (काचबिंदू), वयोमानानुसार होणारा मॅक्युलर डिजेनेरेशन (AMD), रक्तदाबामुळे रेटिनामध्ये होणारे बदल आणि इतर रेटिनासंबंधित विकारांचे निदान करण्यास मदत होते.

या तपासणीचे फायदे म्हणजे आजारांचे लवकर निदान, भविष्यातील तुलनेसाठी डिजिटल नोंद, आजाराच्या प्रगतीचे अचूक निरीक्षण, योग्य उपचार नियोजन आणि वेळेवर उपचार करून दृष्टीचे संरक्षण करणे हे आहेत.

या शिबिरासाठी नावनोंदणी लवकर करण्याचे आवाहन करण्यात आले असून शिबिराची वेळ मर्यादित आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
डॉ. दत्तात्रय याळगी – ९१४५२०४४०७
डॉ. निखिल माळी – ९४२१३००५९१
डॉ. श्रद्धा राठोड – ८६२३९८४४४८

“निरोगी रेटिना – निरोगी दृष्टी” या उद्देशाने आयोजित करण्यात येणारे हे शिबिर नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *