रत्नागिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आलीआहे. दुचाकी खरेदीसाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान चाकू हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरातील कोकणनगर परिसरात घडली. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ जुलै २०२६ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कोकणनगर येथील नायब रेसिडेन्सी परिसरात घडली. याप्रकरणी प्रेम गोपी परियार (वय ३२, रा. मारीगोल्ड सोसायटी, वॉचमन रूम, कुवारबाव, रत्नागिरी, मूळ रा. नेपाळ) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, प्रेम परियार हे त्यांचे नातेवाईक अर्जुन यांच्यासह रमेश पुरण विश्वकर्मा (वय २६, रा. नायब रेसिडेन्सी, कोकणनगर, रत्नागिरी) याला त्याच्या घरी सोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर परत येत असताना परियार यांनी यापूर्वी दुचाकी खरेदीसाठी आरोपीला पैसे दिले असल्याने संबंधित दुचाकी घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र, आरोपीने दुचाकी देण्यास स्पष्ट नकार देत पैसेही परत करणार नसल्याचे सांगितल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.
वादाचे रूपांतर काही क्षणांतच हाणामारीत झाले. दिलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून आरोपीने प्रेम परियार यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर त्याने जवळील चाकूने परियार यांच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच धक्काबुक्कीमध्ये त्यांच्या डाव्या पायालाही दुखापत झाली. जखमी अवस्थेत परियार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी प्रेम परियार यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत रमेश पुरण विश्वकर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमागील नेमके कारण, दुचाकी खरेदीचा व्यवहार आणि पैशांची देवाणघेवाण याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













