दापोली तालुक्यात महिलांवरील वाढत्या अत्याचार, विनयभंगाच्या घटना तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर दापोली पोलिसांनी व्यापक जनजागृती अभियान सुरू केले आहे. पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या पुढाकारातून हे अभियान राबविण्यात येत असून, गावोगावी आणि शाळांमध्ये जाऊन मुली, महिला व पालकांना महिला सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या अभियानाचा शुभारंभ आज जालगाव येथे आयोजित जनजागृती सभेत करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांनी उपस्थित मुली, महिला व पालकांशी संवाद साधत विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनादरम्यान महिलांची सुरक्षितता, स्वसंरक्षण, कायदेशीर हक्क, आपत्कालीन प्रसंगी त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. तसेच ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा याविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांवरील अत्याचार आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन दापोली पोलिसांनी यावेळी केले. समाजात सुरक्षित आणि जागरूक वातावरण निर्माण करण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













