लांजा : बँक खात्याचा गैरवापर करून सायबर फसवणूक, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा

banner 468x60

नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करून मिळालेली रक्कम बँक खात्याच्या माध्यमातून वळवून तिचा अपहार केल्याचा गंभीर प्रकार लांजा येथे उघडकीस आला आहे. बँक ऑफ इंडिया, लांजा शाखेतील एका खात्याचा वापर सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी आणि ती तातडीने इतर खात्यांमध्ये वर्ग करण्यासाठी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.२३ वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ इंडियाच्या लांजा शाखेतील एका खात्यामध्ये सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर ही रक्कम खातेदार आणि खाते हाताळणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ यूपीआय व्यवहारांच्या माध्यमातून इतर खात्यांमध्ये वर्ग करून तिचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे.

तपासादरम्यान, गोविंद राजनगर आणि तारानगर (राजस्थान) येथील नागरिकांची फसवणूक करून मिळालेली रक्कम रत्नागिरी जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारीशी संबंधित सहकारी आणि सहआरोपी यांच्या माध्यमातून या खात्यात वळविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. फसवणुकीतील पैशांचा माग काढणे कठीण व्हावे, या उद्देशाने रक्कम विविध खात्यांमध्ये आणि यूपीआय व्यवहारांद्वारे तातडीने हलविण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन सुरेश भुजबळराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.२० वाजता अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३१८(४), ३१७(२), ६१(२), ३(५) तसेच भारतीय दंड संहितेतील कलम ४२०, ४१९ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणातील खातेदार, आर्थिक व्यवहारांची साखळी, यूपीआय व्यवहारांचा तपशील आणि फसवणुकीच्या रकमेचा अंतिम लाभार्थी यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या रॅकेटमध्ये आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला कमिशन किंवा आर्थिक फायद्याच्या आमिषाने स्वतःचे बँक खाते अथवा यूपीआय आयडी वापरण्यास देऊ नये. अशा प्रकारे खाते उपलब्ध करून देणे हेही गंभीर गुन्ह्यात सहभागी ठरू शकते, असा इशारा पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *