दापोली : फळमाशी नियंत्रणासाठी ‘रक्षक सापळा’ ठरतोय वरदान, साखळोलीत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन

banner 468x60

साखळोली (प्रतिनिधी : सागर गोवळे): कोकणातील फळबागांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या फळमाशीच्या नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी विकसित केलेले ‘रक्षक सापळा’ हे तंत्रज्ञान प्रभावी ठरत आहे. या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ‘कृषी संगिनी’ या विद्यार्थीनींनी साखळोली येथे शेतकऱ्यांच्या शेतावर विशेष प्रात्यक्षिकाचे आयोजन केले.

banner 728x90

ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत आयोजित या उपक्रमात विद्यार्थीनींनी आंबा, पेरू तसेच इतर फळपिकांमध्ये फळमाशीमुळे होणारे नुकसान, त्याचा उत्पादनावर होणारा परिणाम आणि त्यावरील प्रभावी उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली.

फळमाशी नियंत्रणासाठी रक्षक सापळ्याचा वापर कसा करावा, तो शेतात योग्य ठिकाणी कसा लावावा, त्याची कार्यपद्धती आणि त्यातून मिळणारे फायदे यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की, रक्षक सापळ्याच्या वापरामुळे फळमाशीचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होते. त्यामुळे फळांची गुणवत्ता टिकून राहते तसेच रासायनिक कीटकनाशकांचा अनावश्यक वापर कमी होतो. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते आणि पर्यावरणाचे संरक्षणही होते.

रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करण्यास मदत

फळमाशीच्या नियंत्रणासाठी केवळ रासायनिक औषधांवर अवलंबून न राहता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. रक्षक सापळा हे त्यातील प्रभावी आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान असल्याचे यावेळी शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.

या उपक्रमाला साखळोली परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी रक्षक सापळ्याच्या कार्यक्षमतेबाबत विविध प्रश्न विचारले. विद्यार्थीनींनी त्यांच्या शंकांचे निरसन करून सापळ्याचा योग्य वापर, देखभाल आणि त्यातून मिळणाऱ्या परिणामांबाबत सविस्तर माहिती दिली.

फळमाशी नियंत्रणासाठी हे तंत्रज्ञान शाश्वत आणि फायदेशीर उपाय ठरू शकते, अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ‘कृषी संगिनी’ समूहाने भविष्यातही शेतकरी हिताच्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि कृषी जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *