चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार

banner 468x60

लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, चिपळूणच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी नुकतीच विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट देत ग्रंथालय व्यवस्थापनाची पाहणी केली. यावेळी विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष बापूसाहेब काणे व उपाध्यक्षा डॉ. वैशाली जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

भेटीदरम्यान प्रतिनिधी मंडळाने ग्रंथालयातील कथासंग्रह, कादंबऱ्या, शैक्षणिक, धार्मिक तसेच विविध विषयांवरील ग्रंथांचे शिस्तबद्ध वर्गीकरण, वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आलेले व्यवस्थापन आणि वाचकांना पुस्तके सहज उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेली सुसूत्र व्यवस्था यांचा आढावा घेतला. अल्पावधीत सेवाभावी वृत्तीने उभारण्यात आलेल्या या व्यवस्थेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्यवाह धनंजय चितळे म्हणाले, “लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय हे चिपळूण तालुका ग्रंथालय असून तालुक्यातील सर्व ग्रंथालयांना मदत करत असते. विभा ग्रंथालय असो किंवा डॉ. बाबासाहेब ग्रंथालय, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी आम्ही एकदिलाने कार्य करत आहोत.”

कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांनीही भविष्यात साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करण्यासाठी परस्पर सहकार्य कायम ठेवण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. यतिन जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करून या सेवासंधीबद्दल सर्वांचे आभार मानले.

या सदिच्छा भेटीमुळे दोन्ही ग्रंथालयांतील स्नेहसंबंध अधिक दृढ होण्याबरोबरच ग्रंथालय व्यवस्थापनातील अनुभवांची देवाणघेवाण होऊन भविष्यात संयुक्त उपक्रम राबविण्यास चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

या भेटीला लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, उपाध्यक्ष सुनील खेडकर, कार्यवाह धनंजय चितळे, कोषाध्यक्ष सुबोध दीक्षित, सहकार्यवाह विनायक ओक, सदस्य अभिजीत देशमाने, मानसी पटवर्धन, मनीषा दामले, राम दांडेकर, ग्रंथपाल गौरी भोसले, सहग्रंथपाल संदीप जाधव, सुजाता गुढेकर तसेच विभा अरविंद ग्रंथालयाचे कार्यवाह विजय कदम, कोषाध्यक्ष विनायक ओक, सदस्य प्रसाद रिसबूड, प्रा. विकास मेहेंदळे, डॉ. राजश्री सोमण, मेधा बेटकर, प्रकाश गांगण, सुहास चव्हाण आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *