मंडणगड तालुक्यातील तिडे गावाजवळील बोरीचा माळ येथील जंगलात दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मानवी कवटी, हाडे, कपडे, चप्पल तसेच झाडाला गळफासासाठी वापरलेला फास आढळून आल्याने या घटनेची नोंद घेण्यात आली असून मंडणगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती २ मे २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली होती. याप्रकरणी त्यांचे नातेवाईक अविनाश नारायण बर्वे यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नापत्ता रजिस्टर क्र. ५/२०२६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून पोलीस हवालदार मांडवकर हे शोधकार्य करत होते.
दरम्यान, १३ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजता तिडे गावचे पोलीस पाटील रविंद्र पवार यांनी पोलिसांना दूरध्वनीवरून बोरीचा माळ येथील जंगलात एका शिवणीच्या झाडाजवळ मानवी कवटी व हाडे पडल्याची माहिती दिली. त्यानंतर तक्रारदार अविनाश बर्वे आणि त्यांचे चुलत भाऊ प्रथमेश रामचंद्र बर्वे घटनास्थळी पोहोचले.
तेथे झाडाझुडपांमध्ये मानवी कवटी, बरगड्यांची हाडे, चप्पल, हिरव्या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची हाफ पँट आणि टोपी आढळून आली. तसेच जवळील शिवणीच्या झाडाला वेलीच्या साहाय्याने गळफास लावल्याचा फासही दिसून आला.
घटनास्थळी सापडलेले कपडे व चप्पल हे आपल्या बेपत्ता वडिलांचेच असल्याची ओळख अविनाश बर्वे यांनी पटवून दिली. तसेच आढळलेली मानवी कवटी व हाडे ही त्यांच्या वडिलांचीच असल्याची त्यांनी खात्री व्यक्त केली.
या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मानवी अवशेष शवविच्छेदन व पुढील वैज्ञानिक तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. मृत्यूचे नेमके कारण, तो आत्महत्या आहे की अन्य काही कारण, याबाबतचा निष्कर्ष तपास आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











